Big News : भाजप आमदाराने केला पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यावर अंधाधुंद गोळीबार
उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात वाद होत असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. आज अशाच एका वादातून भाजपच्या आमदाराने शिवसेना (शिंदे गट)च्या शहर प्रमुखावर उल्हासनगर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज, शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री उशिरा 50 गुंठे जमिनीच्या वादावरून भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे उल्हास नगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हा गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि जिल्हाप्रमुख राहूल पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेने कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण असून; गोळीबाराच्या घटनेनंतर रुग्णालय परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे.
