Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

शिक्षणाचा दर्जा उत्तम असला तर तरुणांच्या हाती दगड येणार नाही जयंत पाटील यांचे मत

पुणे : शिकल्यामुळे सामान्य घरातील मुले पुढे आली आहेत. परंतु केवळ स्पर्धा परिक्षेच्या मागे न लागता, इतर चांगल्या संधीसाठी स्वतःला समर्थ करा. शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शिक्षणाचा दर्जा उत्तम असला, शिक्षणाचे चांगले संस्कार असतील, तर तरुणांच्या हातात दगड येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

लाईक-माईंडेड इनिशिएटिव्ह फॉर एम्पॉवरमेंट (लाईफ) या संस्थेच्या वतीने लाईफ स्फूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृहात सन्मान सोहळा झाला. यावेळी श्री चैतन्य कानिफनाथ महाराज ट्रस्टचे सुदामराव गोरखे गुरुजी, संस्थेचे अध्यक्ष ओंकार कोंढाळकर, अॅड. भूषण राऊत, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे, प्रधुम्य किराड, हर्ष माने, सिद्धांत पुजारी, शुभम गाडे, मानसी कोंढरे, एकता गाडे, अपुर्वा भोसले उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा ५ वे वर्ष आहे. सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, आमदार निलेश लंके, भारत पेट्रोलियमचे मुख्य महाव्यवस्थापक संतोष सोनटक्के, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मिलिंद पवार, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना लाईफ स्फूर्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अंकुश राक्षे, मयूर चौखंडे, कुलदीप आंबेकर, पूजा राऊत, स्वप्निल बनसोडे यांचा विशेष युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुदामराव गोरखे गुरुजी म्हणाले, तरुण हे देशाची संपत्ती आहेत. त्यामुळे बुवा-बाजी, करणी अशा गोंष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा चांगला माणूस बना. माणसामधला परमेश्वर शोधा. माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे.

जयंत पाटील म्हणाले, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी एकत्र आल्यावर सरकारमध्ये बोनलेस अधिकाऱ्यांची संख्या वाढते.  राजकारण्यांनी साधेपणा अंगिकारला पाहिजे. व्हिआयपी सिन्ड्रोम ब्रेक व्हायला हवा. कोणताही बडेजाव न करता काम करायला हवे. मेरीटला महत्त्व आले तरच देशाची प्रगती होईल.

सध्याची तरुण पिढी स्पर्धा परिक्षेच्या मागे लागली आहे. परंतु सरकार सध्या कंत्राटावर भरती  करताना दिसत आहे. त्यामुळे तरुणाईने काळजी करायला हवी. स्पर्धा केवळ स्पर्धा परिक्षेतच नाही. खाजगी क्षेत्रात देखील अनेक चांगल्या संधी आहेत. असेही त्यांनी सांगितले.
संजय पोमण यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार कोंढाळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रधुम्य किराड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading