दिव्यांगांच्या कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या ‘प्रोत्साहन’ प्रदर्शनाला प्रारंभ
पुणे : वायरच्या वस्तू तयार करणे, पोळ्या करणे, भाजी चिरणे-निवडणे… अशी कामे सामान्य व्यक्ती अत्यंत सहजपणे करु शकतात. मात्र, दृष्टी नसतानाही ही कामे अत्यंत व्यवस्थितपणे करणा-या दृष्टीहिन आणि दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या कलात्मक वस्तूंच्या प्रदर्शनाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील २८ दिव्यांग व्यक्ती आणि १२ संस्थांचा सहभाग असलेल्या प्रोत्साहन प्रदर्शनात दिव्यांगांनी कलागुणांचे सादरीकरण देखील केले.
दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२३ या प्रदर्शनाचे आयोजन कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन अॅबिलिम्पिक्स रौप्यपदक पदक विजेत्या कर्णबधिर कलाशिक्षिका प्रियांका दबडे आणि भाग्यश्री नडिमेटला यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रदर्शनाच्या संयोजिका रेखा कानिटकर, रंजना आठल्ये, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, अमृता पटवर्धन, अबिदा खान आदी उपस्थित होत्या. विद्याज्योती स्पेशल स्कूल, प्रिझम फौंडेशन, शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रम, संवाद, नंदनवन, साई गुरु सेवा संस्था, स्मित फाऊंडेशन, गुरुकृपा स्पेशल स्कूल, लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, अवेकनिंग चॉरिटेबल ट्रस्ट, उन्मेष फाऊंडेशन, मैत्र फाऊंडेशन आदी संस्थांसह वैयक्तिकरित्या देखील दिव्यांगांनी सहभाग घेतला आहे.
आकाशकंदील, भेट पाकिटे, कागदी फाईल्स, खाद्यपदार्थ, दागिने, वायरच्या बास्केट, तोरण, उदबत्या, दिवे, रांगोळी, ज्यूट बॅग, हँड पेंटेड स्टोल्स, पणत्या, पायपुसणी, नॅपकीनचे बुके यांसह शेकडो प्रकारच्या दिव्यांगांनी साकारलेल्या वस्तू प्रदर्शनात आहेत. सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे. रविवार, दिनांक १ आॅक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
