महिला आरक्षण : तेच चेहरे, तेच मोहरे आणि आटलेल्या विहिरीत फुटलेले पोहरे असं का म्हणाल्या? सुषमा अंधारे
पुणे : महिला आरक्षण विधेयकाचे भिजत घोंगडे गेली सत्तावीस वर्षापासून पडून आहे. पहिल्यांदाच मोदींनी असे विधेयक क्रांतिकारी पद्धतीने आणले असा जर व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतील मिसरूड न फुटलेल्या भक्तूल्यांचा समज असेल तर त्यांना हा इतिहास माहीत असायला हवा. विविध प्रवर्गातून आलेल्या महिलांच्या आरक्षणाची यात चर्चा होणार नसेल आणि पुन्हा सरसकट प्रस्थापितांच्याच महिला पुढे येणार असतील तर मग या विधेयकाची गत, ” तेच चेहरे तेच मोहरे आणि आटलेल्या विहिरीत फुटलेले पोहरे अशी होईल” असे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
जर यावेळी पुन्हा एकदा महिला आरक्षण विधेयकावर साधक-बाधक चर्चा होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु असे आरक्षण सरसकट असण्यापेक्षा यातील एससी एसटी ओबीसी मायक्रो ओबीसी यांच्या जागा कशा असतील हे सुद्धा विस्तृत यायला हवे. या आधी जेव्हा महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने मांडले गेले. तेव्हा बहुजन समाज पार्टीच्या नेत्या बहन मायावती यांनी विरोध केला असा कांगावा भारतीय जनता पार्टीने केला होता. मात्र बहनजीनी घेतलेली भूमिका ही एससी , एसटी आणि ओबीसी च्या महिलांचे आरक्षण वितरण कसे असेल हे आधी सांगा अशी होती. आणि विशेषत्वाने अशा आरक्षण वितरण व्यवस्थेला विरोध तात्कालीन भाजप नेत्या उमा भारती किंवा सुषमा स्वराज यांनी केला होता हे ज्ञात असावे. जर विविध प्रवर्गातून आलेल्या महिलांच्या आरक्षणाची यात चर्चा होणार नसेल आणि पुन्हा सरसकट प्रस्थापितांच्याच महिला पुढे येणार असतील तर मग या विधेयकाची गत, ” तेच चेहरे तेच मोहरे आणि आटलेल्या विहिरीत फुटलेले पोहरे अशी होईल” असे अंधारे यांनी म्हटले आहे.