Crime News : मुलाने केला वडिलांचा खून
पुणे- “कामधंदा करीत जा तसेच व्यवस्थित राहत जा” असे म्हणणाऱ्या वडिलांनाच मुलाने छातीत कात्रीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी येथे घडली.या घटनेत लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय 55, रा. मास्टर कॉलनी, टिंगरे नगर) यांचा खून झाला असून आरोपी मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय 22) याला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंजुळे हे मुलगा शिवनाथ याला “काम धंदा करीत जा,व्यवस्थित राहत जा” असे नेहमी म्हणत असत. त्याचा राग डोक्यात ठेवून शिवनाथ याने सोमवार 18 सप्टेंबर रोजी पहाटे झोपेत असलेल्या लक्ष्मण मंजुळे यांच्या छातीत व पोटात घरातील कैचीने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस घटनास्थळी रवाना झाले. आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आली असून अटक करण्यात आलेली आहे. लक्ष्मण मंजुळे हे मजुरी करत असत. त्यांच्या घरी पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.याप्रकरणी बाबु रामु दांडेकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे करीत आहेत.