फॅमिली डॉक्टर संकल्पना रुजणे गरजेचे – डॉ. आश्विनी कुमार मानकोसकर
पुणे : पूर्वी पेशंटचे समाधान होईपर्यंत त्याचे समुपदेशन केले जात असे, आजार नेमका कोणता आहे, तो कसा बरा होतो हे सांगितले जायचे. त्यामुळे पेशंटही डॉक्टरवर विश्वास ठेवून होते. आता वैद्यकीय क्षेत्रात कॉर्पोरेट संस्कृती रुजू लागल्यामुळे आरोग्याच्या छोट्या तक्रारींसाठीदेखील मोठ्या रुग्णालयात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारण एक ते दोन दशकांपूर्वी फॅमिली डॉक्टर हा कुटुंबाचाच एक सदस्य मानला जायचा.
पणजोबांपासून नातवापर्यंत सर्व कुटुंबाच्या आरोग्याची पार्श्वभूमी फॅमिली डॉक्टरला माहीत असायची. रुग्णाचा त्रास समजून घेऊन आणि मूलभूत तपासणी करून डॉक्टर नेमके औषधोपचार देऊन रुग्णाला दोन-तीन दिवसांमध्ये खणखणीत बरा करायचे. आजच्या काळात आरोग्याच्या समस्या वाढत असताना फॅमिली डॉक्टर ही काळाची गरज असल्याचे मत नामांकित फॅमिली फिजिशियन हृदयरोग आणि मधुमेह तज्ञ डॉ. आश्विनी कुमार मानकोसकर यांनी व्यक्त केले.कर्वेनगरमधील मानकोसकर क्लिनिकतर्फे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जेष्ठ नागरिकांचा सहभाग मोलाचा होता. जवळपास ३०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी जगप्रसिद्ध सर्जन डॉ. धनंजय केळकर, ज्येष्ठ फिजिशियन डॉ. राघवेंद्र मंगरूळकर, डॉ. यश मानकोसकर, डॉ. कृष्णा येलझी, डॉ. राहुल केळेकर उपस्थित होते. तसेच कोथरूड, कर्वे नगर, सिंहगड रोड, सहकार नगर, बावधन, प्रभात रोड, वारजे, सदाशिव पेठ, कात्रज परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.या शिबिरामध्ये अस्थि घनता परीक्षण, मधुमेह निरोपथी तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्त शर्करा तपासणी, ऍसिडिटी तपासणी, शरीराच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच यावेळी नेत्रदान रजिस्ट्रेशन व केंद्र सरकारचे आयुष्मान भारत डिजिटल मिशन’(आभा) अंतर्गत डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) यावेळी काढण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना फायदा झाला.