मातृत्व रजेवर असलेल्या महिलांसाठी सिटी बँक इंडियाने १२ महिन्यांचा वर्क फ्रॉम होमचा आणला पर्याय
मुंबई – सिटी बँकेने आता आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय आणला आहे. ज्या महिलांची 26 आठवड्यांची मातृत्व रजा संपत आहे, त्या बारा महिन्यांसाठी वर्क फ्रॉम होमसाठी विनंती करू शकतात. याशिवाय प्रेग्नेंसीच्या अखेरच्या तीन महिन्यांत गरज असल्यास महिला वर्क फ्रॉम होमसाठी विनंती करू शकतात. त्यावर विचार होऊन, संमती मिळू शकते. या नव्या उपक्रमामुळे नवमातांसाठी 21 महिने घरून काम करण्याची संधी निर्माण होणार आहे.
केंद्र सरकारने मातृत्व रजेशी संबंधित वर्क फ्रॉम होम उपक्रमासंदर्भात ॲडव्हायझरी जारी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणारी सिटी इंडिया ही पहिली कंपनी आहे. महिलांसाठी ही योजना राबवली जाऊ शकते, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे महिलांना मातृत्व आणि करिअर यामध्ये संतुलन साधण्यास मदत होते.
सिटी इंडिया आणि साऊथ एशियाचे मुख्य ह्युमन रिसोर्स अधिकारी आदित्य मित्तल म्हणाले की, सिटी इंडियाच्या सर्व शाखांमध्ये महिलांसाठी ही योजना सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ही योजना सुरू करणारे आम्ही पहिलेच आहोत. मातृत्वाच्या काळात दीर्घ रजा घेणाऱ्या किंवा दीर्घकाळाचा ब्रेक घेणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे, असे एका अभ्यासातून दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होताना दिसतो. परिणामी वरिष्ठ पातळीवर महिलांचे प्रमाणही कमी दिसून येते. या एका पावलामुळे महिला टॅलेंट आमच्याकडे कायम राहील आणि महिलांच्या करिअरच्या आकांक्षांना अपेक्षितवेळी बळ मिळेल. यामुळे सरकारचे धोरण राबवण्यासाठी उद्योगांमध्ये एक प्रेरणाही मिळेल, ही आशा आहे.
पर्सनल बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंटच्या डिजिटल सॉफ्टवेअर इंजिनियर मेघा मंगल नुकत्याच मातृत्व रजेवरून परतल्या आहेत. त्या म्हणाल्या की, सिटीने माझ्या कठीण काळात दिलेले सहकार्य अमूल्य असे होते. त्यामुळे मला करिअरची फार चिंता न करता मातृत्वाचा आनंद घेता आला आणि मातृत्वातील आव्हानेही पेलता आली. मी घरी बसूनही काम करू शकते आणि माझा जॉब सुरू राहू शकतो, या विचारानेच मी माझ्या मातृत्वाच्या काळात शांत आणि समाधानी होते. सिटीच्या मॅटर्निटी लीव्ह पॉलिसीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
सिटी इंडियामध्ये ३० हजार कर्मचारी आहेत आणि त्यात महिलांचे प्रमाण ३८ टक्के आहे. या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांचे करिअर सुरू राहील. मध्य वरीष्ठ वरिष्ठ पोझिशन्समध्ये महिलांचे प्रमाण सध्या 30 टक्के असे चांगले प्रमाण आहे. या उपक्रमामुळे ते असेच कायम राहील, किंबहुना त्यात वाढ होत राहील.
वर्क लाइफ बॅलन्स साधण्यासाठी सिटीने सातत्याने नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. यापूर्वीही असे उपक्रम राबवलेले आहेत. 2019 मध्ये महिला आणि युएस मायनॉरिटीजमध्ये पे गॅप भरून काढण्यासाठी उपक्रम राबवला होता. असा उपक्रम राबवणारी पहिली कंपनी होती. 2021 मध्ये फ्लेक्सिबल वर्किंग मॉडेल लॉन्च करणारी पहिली वॉल स्ट्रीट बँक होती. 2018 मध्ये काही आकांक्षा ठेवत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते ते 2021 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर 2022 मध्ये त्यात वाढ करण्यात आली. त्यामुळे सिटीमध्ये भारतात आणि जागतिक पातळीवर वैविध्यता वाढल्याचे दिसून येते.
