ईशा शर्मा साकारतेय काश्मिरी कन्या
दूरचित्रवाणीवर आपल्या प्रकारची पहिलीच मालिका सोनी सबवरील ‘पश्मिना – धागे मोहब्बत के’ एक सुंदर प्रेमकहाणी सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. काश्मीरच्या जादुई खोऱ्यांत मालिकेचे कथानक बेतलेले असून तिथेच चित्रीकरणही झाले आहे. मंत्रमुग्ध करणारी ही कथा पश्मिना (ईशा शर्मा अभिनीत) आणि राघव (निशांत मलकानी अभिनीत) या दोन पात्रांच्या अवतीभोवती फिरते. अतिशय वेगळ्या विश्वातील या दोन व्यक्तिरेखा नियतीमुळे एकत्र येतात.
या भुरळ पाडणाऱ्या मालिकेच्या कथास्थानी आहे पश्मिना नावाची महिला. या दिलखुलास आणि तरुण महिलेचा प्रेमाची संकल्पनेवर नितांत विश्वास आहे. आपणही एका अद्वितीय प्रेमकहाणीचा अनुभव घेऊ, असे तिचे स्वप्न असते. काश्मीरची ही भूमिकन्या उत्साह, सकारात्मकता, लोभस हास्य यांनी भारलेली आहे. तिच्याकडे एक हाऊसबोट असून ती काश्मीरात येणाऱ्या पर्यटकांना किरायाने देत असते. मात्र ती जेव्हा राघवसोबत एकाच मार्गावर येते तेव्हा तिच्या आयुष्याला रंजक कलाटणी मिळते. राघव हा मुंबईतील एक यशस्वी उद्योजक असून प्रेमाबाबत त्याच्या विरोधाभासी कल्पना आहेत. अशा या दोन परस्परविरोधी व्यक्तिमत्वांमुळे विचारांचे युद्ध पेटण्याची सज्जता होऊन बसते.
मालिकेत पश्मिना सुरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा शर्मा म्हणाली की, “पश्मिनाच्या व्यक्तिरेखेसोबत मला खूप जवळीक असल्याचे वाटते. तिच्यामते प्रेम ही एक जादू असते. आपण जेव्हा त्याचा बहर आणि उत्कटतेने त्याचा अनुभव घेत असतो तेव्हा जगातील सर्वच गोष्टी जादुई भासायला लागतात. काश्मीरात चित्रीकरण करणे हा तर खूप हरखून टाकणारा अनुभव होता. यातून आम्हाला आमच्या व्यक्तिरेखा अस्सलपणे जगता आल्या. कथाकथनाची मर्यादा उंचवणाऱ्या या मालिकेचा एक भाग बनणे ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. जी उत्कटता आणि समर्पणाने या मालिकेत आम्ही काम केले आहे, त्याच पद्धतीने प्रेक्षकांचाही या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळेल, अशी मला आशा आहे.”
लवकरच तुमच्या टीव्ही स्क्रीनवर झळकणाऱ्या सोनी सबवरील बहुप्रतीक्षित पश्मिना मालिकेचे अपडेट्स चुकवू नका!