fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNE

कविता हे मौनाचे भाषांतर : प्रा. मिलिंद जोशी

पुणे : चंगळवादाने तरुण पिढीला कला, साहित्यापासून दूर नेले आहे तर दुसरीकडे समाज अतिसंवेदनशील झाला आहे. त्यामुळे कलावंतांना झुंडशाहीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कलेची जोपासना करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. संदीप खरे यांच्या कवितेने जगण्याचे बळ दिले. कविता ही मौनाचे भाषांतर असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.

आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांना आज (दि. 7) प्रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे संचालक सचिन ईटकर, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर व्यासपीठावर होते. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, कविता हा केवळ टिंगल करण्याचा विषय होता त्याकाळी खरे यांनी शब्दसामर्थ्यातून कवितेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य केले. त्यांच्या काव्यात शब्दमाधुर्य आहे, पण कुठेही उथळ मांडणी दिसत नाही. आज कवितेच्या प्रांतात अनुभव विश्व तोडके असतानाही शब्दबंबाळ लेखन समोर येत आहे. ॲड. आव्हाड यांच्याविषयी बोतलाना ते म्हणाले, ॲड. आव्हाड सतत कार्यमग्न असायचे. भारतीय संस्कृतीतील अष्टांगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.
सत्काराला उत्तर देताना संदीप खरे म्हणाले, जीवनाच्या अनेक क्षितीजांना स्पर्श करण्याची उर्मी ज्यांच्यामध्ये असते अशी मोजकी व्यक्तीमत्वे असतात. ॲड. आव्हाड यांच्या नावाने मिळत असलेल्या पुरस्कारामुळे दडपून टाकले जाण्याची भावना असते. मनापासून असलेल्या कृतज्ञतेला जास्त शब्द नसतात असे वाटते. कलाकार कुठलाही असू देत कलाकाराची यात्रा एकांताची असते. उर्मी आणि संघर्षाच्या वाटेवर जगत असताना एकटेपणा जाणवायला लागतो. कवी इतका दुसरा कोणी असह्य नसतो, कारण कविता सुचणे हे आपल्या हाती नसते. ते पुढे म्हणाले, अंधारी वाट पुरस्काराच्या माध्यमातून सुसह्य होत असली तरी जबाबदारीही वाढविणारी असते. खरे यांनी काही कविता सादर करून काव्याच्या प्रांतातील प्रवास उलगडला.
ॲड. आव्हाड यांनी निर्मळ मनाने पिढी घडविल्याचे सांगून सचिन ईटकर म्हणाले, ॲड. आव्हाड यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला जात आहे. ते निष्णात वकील होते त्याचप्रमाणे चतुरस्र रसिक, उत्तम वक्ता आणि लेखकही होते.
ॲड. आडकर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. आडकर फौंडेशन गेली 28 वर्षे ॲड. आव्हाड यांचा वाढदिवस साजरा करीत आहे. ॲड. आव्हाड यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कर्तृत्ववान व्यक्तीला पुरस्कार देऊन सन्मानित केले जात असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सन्मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: