fbpx
Saturday, September 30, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुपने फोडली

पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण ; श्रीकृष्ण – कालियामर्दन असा भव्य ३० फूट उंचीचा एलईडी लाईट हलता देखावा

पुणे : बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. गुरुवारी रात्री ८ वाजून ५५ मिनीटांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पुण्याच्या दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षक असलेल्या सुवर्णयुग तरुण मंडळाचा दहीहंडी उत्सव पाहण्याकरिता गोपाळ भक्तांनी मोठी गर्दी झाली होती. यंदाच्या वर्षी साकारण्यात आलेला श्रीकृष्ण – कालियामर्दन असा भव्य ३० फूट उंचीचा एलईडी लाईट हलता देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कसबा पेठेतील राधे कृष्ण ग्रुप दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला रुपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मच गया शोर… काठीन घोंगड घेऊ द्या… सुनो गौरसे दुनियावालो… जय श्रीराम… यांसारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. सुरुवातीला सायंकाळी ढोल ताशा वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: