fbpx
Tuesday, September 26, 2023
Latest NewsPUNE

सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गीतरामायण, व्याख्यान, प्रतिथयश 50 कलाकारांच्या सुवर्ण संगीत मैफलीचे आयोजन

पुणे : सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्ट यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीधर फडके यांचे गीतरामायण, मोहन शेटे यांचे ‌‘पालखेडची लढाई’ या विषयावर व्याख्यान तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रथितयश 50 गायकांची सुवर्ण संगीत मैफल आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, सेक्रेटरी विनय कुलकर्णी, कार्याध्यक्ष विजय ममदापूरकर यांनी निवेदनाद्वारे दिली.

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला इस्कॉन, पुणेचे धीरशान्त दास यांच्या श्रीमद भागवत सप्ताहाने सुरुवात झाली आहे. सहकार नगर क्रमांक दोनमधील मंडळाशेजारील भव्य पटांगणात कार्यक्रम होत आहेत. महिलांसाठी घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यात गोपाळकृष्ण भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्पर्धेत स्वरझंकार भजनी मंडळ द्वितीय, स्वरांजली भजनी मंडळ तृतीय आले तर सुखकर्ता भजनी मंडळ, लक्ष्मी-पार्वती भजनी मंडळ (आळंदी) आणि विश्वकर्मा भजनी मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे. शनिवारी (दि. 9) महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बुधवारी (दि. 13) महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 14 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीधर फडके गीतरामायण आणि दि. 15 रोजी ‌‘बाबूजी आणि मी’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. 16 आणि दि. 17 रोजी सहजीवन गायन स्पर्धा, दि. 20 रोजी सिनेस्टार रमेश परळीकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे. दि. 23 रोजी चित्रकला स्पर्धा आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तर दि. 24 रोजी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
दि. 24 रोजी सायंकाळी 6 वाजता पंडित राजेश दातार यांचा संगीत सरिता कार्यक्रम होणार असून दि. 25 रोजी सायंकाळी 7 वाजता मोहन शेटे यांचे ‌‘पालखेडची लढाई’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. 26 रोजी 50 गायक कलाकार एकाच मंचावर येत असून सुवर्ण संगीत मैफल सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे. दि. 27 रोजी रांगोळी स्पर्धा आणि श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खले आहेत.
मंगळवार, दि. 19 रोजी दुपारी 3 वाजता श्रींचे भव्य मिरवणुकीद्वारे आगमन होणार असून त्यानंतर स्थापना केली जाणार आहे. तर दि. 28 रोजी श्रींची विसर्जन मिरवणूक दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: