मराठा आरक्षण : शासन निर्णया नंतरही ‘या’ कारणासाठी जरांगे उपोषणावर ठाम
जालना : आम्ही हट्टाला पेटलेलो नाही, अन् पेटणार ही नाही, पण राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला फायदा नाही. त्यात सुधारणा करण्यात यावी, वंशावळ नोंदी ऐवजी सरसकट सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पुनरुच्चार केला.
जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 10 वा दिवस आहे. काल राज्य सरकारने ‘ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या वंशावळ प्रमाणे नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाण पत्र देण्यात येईल’, असा निर्णय घेताला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. त्यावर आज उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी आपली भूमिका मांडली.
जरांगे म्हणाले, आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. परंतु आम्हाला या शासन निर्णयाचा काहीही फायदा नाही. कारण मराठा बांधवांकडे कुणबी असल्याच्या नोंदी आहेत त्यांना जात प्रमाणपत्रासाठी या निर्णयाची गरज नाही. ज्यांच्याकडे कुणबी असल्याच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी आमचा लढा आहे. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयात सुधारणा करावी. तसेच वंशावळ नोंदी ऐवजी सरसकट सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी केली. तसेच जोवर शासन निर्णयात बदल होत नाही व जिआर निघत नाही तोवर उपोषण चालूच ठेवण्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.