Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

जातिनिहाय जनगणना बाबत भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. – नाना पटोले

नागपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाडी सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. तसेच काही ओबीसी संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून राज्य सरकार कोंडीत सापडले आहे. आता यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारसह पंतप्रधान मोदींवर तोफ डागली आहे. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ओबीसी आग आहे, सरकारने या आगीत पडू नये, असा इशारा त्यांनी सरकाराला दिला आहे.

नागपूरमध्ये नाना पटोले पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, सत्तेसाठी काहीपण ‘ही’ भाजपची भूमिका आता त्यांच्याच अंगलट येत आहे. भाजपने त्या काळात ती चूक केली आहे. २०१४ साली बंजारा समाजाला आदिवासीं शेड्युल कास्टमध्ये आरक्षण देऊ, असे आश्‍वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. बंजारा समाजाला, मराठयांना आश्वासन देऊन भाजप सत्तेत आली, पण त्यांना न्याय देऊ शकले नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जातिनिहाय जनगणना करू, असा ठराव रायपूरला करून घेतला. सेन्सेस झाले पाहिजे. भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. फोडा आणि राज्य करा अशी एकेकाळची इंग्रजांची भूमिका भाजप वठवत आहे आणि आपसांत भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे.

नाना पटोले म्हणाले की, पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात दोन टक्के आरक्षण राहिले आहे. सर्वच समाजाची संख्या वाढली आहे. तिथे आजही लोक मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. ५० टक्के सिलिंग तुटले पाहिजे. अधिवेशन बोलवत आहात आणि अजेंडा पुढे येत नाही. मणिपूर पेटले आहे, पण पंतप्रधान बोलायला तयार नाही, हे काय चालले आहे? सरकारने स्वतःच्या चुकीमुळे ओबीसी-मराठ्यांत भांडण लावू नये. जातिनिहाय जनगणना केली पाहिजे आणि ४० टक्के आरक्षण सीमा काढून टाकली पाहिजे. मात्र सरकार गैरसमज पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रालासुद्धा मणिपूर करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. आता ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावण्याचे काम होत आहे. जातिनिहाय जनगणना हा यावरचा उपाय आहे. मात्र सत्ताधारी भाजप अजूनही त्याला विरोध करत आहे.

नाना पटोले म्हणाले की, गायकवाड आयोग हा चुकीचा आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. तिरोडकर, सदावर्ते हे कोणाचे माणसे होते? मराठ्यांची बाजू मांडू नका, हे फडणवीसांनी सांगितले, म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली, असेही पटोले म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading