fbpx
Tuesday, October 3, 2023
Latest NewsMAHARASHTRA

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ देवनार येथे लेदर पार्क उभारणार

मुंबई  : चर्म व्यवसायवाढीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने (LIDCOM) विविध योजना राबविण्यात येत असून देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही क्लस्टर धोरण असावे यासाठी महामंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मुंबई देवनार येथे दोन एकर क्षेत्रावर महामंडळाच्या माध्यमातून लेदर पार्क  उभारण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.

इंडियन फूटवेअर कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IFCOMA) यांच्यावतीने मुंबई येथे नुकतेच दोन दिवसाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन इंडियन फूटवेअर कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IFCOMA) चे पश्चिम विभागाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश बसीन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट चेन्नईचे कार्यकारी संचालक आर सेलव्हम (भा.प्र.से), फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे सचिव पंकज कुमार सिन्हा, मलिक ट्रेडर्स मुंबईचे एच. आर. मलिक उपस्थित होते.

या प्रदर्शनाच्या अनुषंगाने कौन्सिल फॉर लेदर एक्सपोर्ट यांनी चर्मोद्योग व्यवसायातील उद्योजकांची तसेच निर्यातदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस देशभरातील 70 उद्योजक तसेच निर्यातदार उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील मौजे रातवड तालुका माणगाव येथे मेगा लेदर फुटवेअर अँड ॲक्सेसरीज क्लस्टरबाबत श्री. गजभिये यांनी उपस्थितांना माहिती दिली. राज्यात लिडकॉमच्यावतीने चर्म व्यवसायाच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: