आयसीसी तर्फे ‘पोस्ट हार्वेस्ट अँड फूड प्रोसेसिंग समिट’चे आयोजन
महाराष्ट्राच्या कृषी मूल्यसाखळीला बळकटी देण्यावर भर
पुणे – इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (आयसीसी) यांच्या वतीने ‘पोस्ट हार्वेस्ट अँड फूड प्रोसेसिंग समिट’चे आयोजन हयात पुणे, कल्याणीनगर येथे करण्यात आले. या समिटमध्ये महाराष्ट्राची कृषी मूल्यसाखळी मजबूत करणे, पीक काढणीनंतरचे नुकसान कमी करणे, कृषी उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन वाढवणे आणि शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली.
शिखर परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयसीसीच्या कृषी व अन्नप्रक्रिया समितीच्या सह-अध्यक्ष लीलावती गुप्ते आणि अतुल मराणे, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भावनी शंकर, प्रवीण सुहाना मसालेवालेचे संचालक आनंद चोरडिया, महाराष्ट्र शासनाचे स्टेट प्रोजेक्ट लीड मॅनेजर अमोल चिदवार, मॅग्नेट (MAGNET) प्रकल्पाचे प्रकल्प संचालक शिरीष कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. दत्तात्रय भरणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, त्यासाठी शासनाच्या वतीने सातत्याने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शेतीचे खरे मूल्य केवळ उत्पादनात नसून, उत्पादित मालाची योग्य साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि प्रभावी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक सक्षमता अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी भरणे पुढे म्हणाले की, राज्यामध्ये अजूनही पारंपारिक शेती करण्यात येते. एक पीकाच्या पद्धतीमुळे शेतकरी बांधवांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. यातून कर्जबाजारीपणा वाढत असून यामुळे अनेक आत्महत्या होत आहेत. त्यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योगांनी पुढाकार घेण्याचे आवाहान केले. ते पुढे म्हणाले की, विविध बाजारपेठा आणि प्रक्रिया हेच आधुनिक शेतीचे आधारस्तंभ आहेत. शेतीमध्ये प्रक्रिया व्यवस्थेच्या विस्ताराने शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवता येवू शकते. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे नवीन उद्योजक तयार होवू शकतात. मात्र या उद्योगांनी शेतकरी बांधवांना साथ देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
या शिखर परिषदेस महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्प, नाबार्ड, अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित विविध संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) बळकट करण्यासाठी कार्यरत नाम फाउंडेशन, ऑल इंडिया फूड असोसिएशन, द पूना चेंबर, अॅडव्हायटा (स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर) तसेच रॉयल कॅनिन इंडिया यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी महिला नेतृत्वाखालील ‘किसान कल्याण’ उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘पृथाशक्ती शेतकरी ॲप’चेही लोकार्पण करण्यात आले. हे ॲप शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध माहिती, शासकीय व इतर सेवा तसेच व्यवसाय आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
