Wednesday, July 29, 2026
Latest NewsPUNE

शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडते – अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते

 

शोभाताई हांगे लिखित ‘मनातले मोती’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

पुणे – कवयित्री शोभाताई हांगे यांच्या कवितांमधून ग्रामीण भागातील स्त्रीजीवनाचे वास्तव तरीही सकारात्मक दर्शन घडते, असे प्रतिपादन पुणे शहराच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी रविवारी येथे केले. “जसे मनात उमटले तसे कागदावर आणण्याचे धाडस आणि पराकोटीचा प्रामाणिकपणा, ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत”, असेही त्या म्हणाल्या.

शोभाताई शिवाजीराव हांगे लिखित ‘मनातले मोती’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नव्या पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात कवयित्री शोभाताई हांगे यांच्यासह निवेदिका व कवयित्री लीनता माडगूळकर आंबेकर, समाजसेविका सारिका भरणे, पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील, प्रसिद्ध वक्ते प्रा. गणेश शिंदे हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिवाजीराव हांगे, सत्यजीत हांगे, अजिंक्य हांगे, छाया घुले, दुर्गा वाघ, चंद्रकला सानप, शशिकला मुंढे आणि कुटुंबियांची उपस्थिती होती.

तेजस्वी सातपुते पुढे म्हणाल्या, मी स्वतःदेखिल कवयित्री आईची लेक आहे आणि आईच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा योग, मीही अनुभवला आहे. शोभाताई ग्रामीण जीवनात दीर्घकाळ राहिल्या. जुन्या काळातील परिस्थितीचा विचार करता, त्यांनी सोसलेल्या दुःखातून जन्मलेली अशी त्यांची कविता आहे. ही कविता व्यथा, वेदना जरूर मांडते, पण ती नकारात्मक नाही. शोभाताईंमधील मातृत्व विलक्षण तेजस्वी आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेतून प्रांजळ, निखळ, सरळ अशा सोशिक मनाचे प्रतिबिंब दिसते. प्रकाशित करायच्या म्हणून या कवितांचे लेखन झालेले नाही तर जे सोसले, ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न आहे.

मनोगत मांडताना शोभाताई हांगे म्हणाल्या, हे केवळ पुस्तक नाही तर माझ्या जीवनप्रवासाचा आरसा आहे. ग्रामीण भागातील स्त्रियांना व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. त्यांच्याजवळ साधने नसतात. माझ्याजवळही नव्हती. संसार वाढला तसे वेगवेगळ्या पातळ्यांवर सोसणेही वाढले तेव्हा मी कागद – पेन जवळ केले आणि त्याच्या कविता झाल्या. माझे सोसणे, वेदना शब्दरूपात कागदावर उतरू लागले. या कविता माझ्यासाठी शक्ती ठरल्या. धीर देणाऱ्या जणु सख्या होत्या. आजही ग्रामीण भागातील अनेकींची आयुष्ये रांधा-वाढा, या चक्रात निघून जातात. मनासारखे त्यांना जगता येत नाही. तशी संधी नसते. पण मी सुदैवी ठरले. मला विश्वास ठेवणारे पती मिळाले, त्यांनी साथ दिली. कुटुंबियांनी पाठिंबा दिला आणि हा संस्मरणीय क्षण उगवला.

गणेश शिंदे यांनी संवादाची, परिवर्तनाची सुरवात अंतर्मनात होते, तेव्हाच कवितेचा जन्म होतो. शोभाताईंच्या कविता अशाच अंतर्मनातून आल्या आहेत, असे प्रतिपादन केले. ग्रामीण बाजाच्या या कविता नातेसंबंध, ग्रामीण जगणं आणि सोसणं, याविषयी बोलतात. आज संपर्कसाधने अनेक, पण संवाद हरवलेला असे चित्र आहे. त्याग करणे, जबाबदार्या स्वीकारणे, नात्यांचा आदर करणे आज हरवून गेले आहे. पण कुटुंब जपले, तरच माणूसपण टिकेल, हे नव्याने सांगण्याची वेळ आली आहे. शोभाताईंच्या कविता हे हरवलेपण सांगतात. वस्तू, उत्पादनांचे जागतिकीकरण झाले तसे प्रेम, वात्सल्य, करुणेचेही जागतिकीकरण व्हावे, असे वाटते.

अंकिता पाटील म्हणाल्या, हांगे कुटुंब आणि पाटील कुटुंबाचे किमान चार पिढ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शोभाताईंचे हे पुस्तक त्यांचे अनुभव, संस्कार आणि वेदनांचे कवितेच्या माध्यमातून प्रकटलेले उद्गार आहेत. आपल्या मातीशी जोडलेले संस्कार त्यांनी पुढच्या पिढीला सोपवले आहेत. नाती जपण्याचा संदेश देणारे हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

लीनता माडगूळकर आंबेकर म्हणाल्या, मायलेकरांना भावुक करणारा हा विलक्षण क्षण आहे. या कवितांमधून पतीला सर्वार्थाने साथ देणारी, घर, कुटुंब, संसार समर्थपणे सांभाळणारी खंबीर गृहस्वामिनी दिसते. पुढच्या पिढीला काळाला साजेशी स्वप्ने दाखवणारी जागरूक माता दिसते, श्रद्धाळू मनाची हळवी स्त्री भेटते आणि नात्यांची वीण घट्ट बांधणारी घरंदाज ग्रामीण स्त्री नेमकेपणाने प्रकट होते. शोभाताईंच्या या कविता म्हणजे अनुभवांच्या शिंपल्यातील अस्सल मोती आहेत. बहिणाबाईंच्या कवितेशी जातकुळी सांगणारी ही कविता वाटते.

सारिका भरणे म्हणाल्या, ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवन चूल-मूल या मर्यादेत असलेल्या काळात शोभाताई वावरल्या. त्या काळात स्त्रियांना जे सोसावे लागत होते, ते त्यांनीही सोसले. पण कवितेच्या माध्यमातून ते मांडले. त्यांच्या कविता म्हणजे ग्रामीण भागातील स्त्रीच्या मनातले आणि जीवनातलेही वास्तव आहे.

शोभाताईंचे सुपुत्र सत्यजीत हांगे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. आईच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन हा विलक्षण योग आहे. आई स्वतः ग्रामीण भागात जन्मलेली आणि लग्न होऊन ग्रामीण भागातच आली. ६० वर्षांपूर्वी जेव्हा सलग चार मुलींचे जन्म झाले, तेव्हा तिला जे सोसावे लागले, त्याची आपण कल्पना करू शकतो. काही कवी निसर्गातून प्रेरणा घेतात, आईने वेदनेतून प्रेरणा मिळवली आहे. कवितालेखन ही कला आहे. आईचे अनुभव वैयक्तिक असले, तरी ते प्रातिनिधिक असल्याने इतरांनाही प्रेरक ठरतील, आधार देतील असे वाटल्याने हा संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. केवळ उच्चशिक्षितांनीच लेखन करावे, असे नाही. आईप्रमाणे तळागाळातील, ग्रामीण भागातील महिलांचे जीवन व्यक्त करणारे लेखनही महत्त्वाचे आहे, ही भावनाही यामागे आहे.

शीतल हांगे, चंद्रकला सानप, शशिकला मुंढे, अजिंक्य हांगे, दुर्गा वाघ यांनी स्वागत केले. सत्संग मुंढे यांनी आभार मानले. ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading