Monday, July 27, 2026
Latest NewsPUNE

जगण्यातल्या, अनुभवांतल्या मोकळ्या जागा भरण्याचा शोध कायम राहावा – मंगला गोडबोले

पुणे :  जगण्यातून, अनुभवांतून ज्या मोकळ्या जागा असतात, त्या भरण्यात कला लपलेली असते. कलाकाराला या शोधाचा नाद सतत असतो. असा शोध, मोकळ्या जागा शोधण्याचा ध्यास विदुषी जया जोग यांच्याही मनात कायम राहावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी शनिवारी येथे केले.

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशन सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत विदुषी जया जोग यांच्या ‘नक्षी स्वरलयीची’ या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्यात त्या बोलत होत्या. जयाताईंच्या शिष्यवर्गाचा या आयोजनात सहभाग होता. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना, गुरू डाॅ. सुचेता भिडे चापेकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी जयाताईंच्या ‘दोन देश, सात घरे – किस्से भटकंतीचे’ या पुस्तकाचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध सतार, बासरी आणि व्हायोलीनच्या सुरेल स्वरांत न्हाऊन निघाला. ज्येष्ठ बासरीवादक पं. गिंडे यावेळी उपस्थित होते. भारतीय विद्या भवन, सरदार नातू सभागृह, शिवाजीनगर येथे हा कार्यक्रम साजरा झाला.

गोडबोले म्हणाल्या, कलाकार शब्द, स्वर, देहाच्या माध्यमातून जी स्पेस भरून काढण्याचा प्रयत्न करतात, तो शोध महत्त्वाचा असतो. जयाताईंनी आपल्या जगण्यातल्या, अनुभवांतल्या अशा मोकळ्या जागा शोधून त्या स्वर-शब्दांतून भरण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही अशा मोकळ्या जागा त्यांनी टिपत राहाव्यात, अशा शुभेच्छा. त्यांचे पुस्तक छोटेखानी आहे. त्यामध्ये कुठलाही दावा त्यांनी केलेला नाही. त्यांनी निवांत क्षणी जी अमेरिका, कॅनडा अनुभवला, त्याविषयीचे हे लेखन आहे. त्यातून त्यांच्यामधील सामाजिक भाष्यकारही दिसतो.

डाॅ. भिडे चापेकर म्हणाल्या, संगीताचे बीज मिळाले तरी ते रुजवावे लागते, त्याचे संगोपन करावे लागते. ते जयाताईंनी केले आहे. त्यांच्या सांगीतिक रचना बांधीव असूनही त्यात विस्तारक्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या रचनांचे नृत्यरूपही साकार होऊ शकते, हे मला जाणवले. त्यांचा सुरेल, आनंदी प्रवास यापुढेही सुरू राहो, य़ा शुभेच्छा.

मनोगत मांडताना जया जोग म्हणाल्या, वयाच्या या टप्प्यावर मी आनंदी आहे. नुकताच केलेला प्रवासही आनंदी निवांतपणा देणारा होता. तरीही ज्या गोष्टी डाचत राहिल्या, बोचल्या त्याविषयी लिहावेसे वाटले, ते या पुस्तकात आहे. माझ्या नावाला जागणारा संघर्ष मी आयुष्यात सतत केला. कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिकता घडविण्याच्या तीन पातळ्यांवर मी झगडत राहिले आहे. इतरही चढउतार अर्थातच आले. पण नेहेमी अर्धा भरलेला प्याला, पाहण्याची मानसिकता ठेवली. उत्तम शिष्य मिळाल्याचे समाधानही मोठे आहे.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रज्ञा नेने, सुचेता गोसावी, बिना लिमकर, रिशान कुलकर्णी, स्वाती घैसास, शताक्षी पाळेकर (सतार) व चक्रवर्ती पाळेकर (बासरी) यांनी वादनातून जयाताईंच्या रचना सादर केल्या. दुर्गा रागातील ऊर्जा या नावाची रचना त्रितालात, हंसध्वनी रागातील नायगरा ही रचना त्रितालात तर जनसंमोहिनी रागातील शरारत ही रचना केरवा तालात निबद्ध होती. अक्षय पाटणकर यांनी तबल्याची साथ केली. उत्तरार्धात स्वतः विदुषी जया जोग (सतार), डाॅ. नीलिमा राडकर (व्हायोलीन) आणि नीलेश देशपांडे (बासरी) यांनी सहवादनातून मधुकंस रागातील कौमुदी नावाची मध्य व द्रुत त्रितालातील रचना तसेच भैरवी रागातील अद्वैत ही दीपचंदी चालातील रचना पेश करून सांगता केली. अभिजीत बारटक्के यांनी तबल्याची साथ केली. डाॅ. नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. रंजना काळे यांनी निवेदन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading