Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या १२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने पुण्यात रंगली संकीर्तन प्रभात फेरी

पुणे  : कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समधील १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भक्तिगीते, अभंग आणि भजनांचे सामूहिक गायन करत काढलेल्या ‘पुणे प्रभात फेरी  नगर संकीर्तन’ या अनोख्या उपक्रमाने शनिवारी सकाळी पुण्याचे वातावरण भक्तिमय झाले. कन्नड संघाच्या कावेरी कलाक्षेत्र आणि कलमाडी शामराव हायस्कूल यांच्या पुढाकाराने आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक पुनीत जोशी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या प्रभात फेरीत विविध वयोगटातील विद्यार्थी आणि नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. या प्रभात फेरी मध्ये कावेरी कलाक्षेत्राच्या प्रमुख व कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी, नगरसेवक पुनीत जोशी, प्रसिद्ध गायिका विदुषी नंदिनी राव – गुर्जर व प्रसिद्ध सितारवादक रईस खान उपस्थित होते. 

कलमाडी शामराव हायस्कूलपासून विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या प्रभात फेरीत कन्नड, मराठी आणि अन्य भाषांतील भक्तिगीतांचे सामूहिक गायन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भक्ती, संगीत आणि सामूहिक सहभागातून भारतीय सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला, तसेच ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’चा संदेशही दिला.

या उपक्रमाबाबत बोलताना पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक पुनीत जोशी म्हणाले, “कोथरूडमध्ये प्रथमच असा आगळावेगळा आणि सुंदर उपक्रम होत आहे, ही खरोखरच आनंदाची बाब आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात प्रभात फेऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने प्रभात फेरीची संकल्पना पुढे आली होती. आजच्या काळातही संकीर्तन आणि प्रभात फेरीचा सुंदर संगम घडवणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे यापुढे ही केवळ सांस्कृतिक प्रभात फेरी न राहता ‘समाज प्रबोधन प्रभात फेरी’ म्हणून पुढे जावी, अशी आमची इच्छा आहे. यात स्वच्छता, वाहतूक, पर्यावरण यांसारख्या विविध सामाजिक विषयांबाबतही जनजागृती करण्यात यावी. अशा प्रकारचे उपक्रम वारंवार आयोजित व्हायला हवेत आणि त्यासाठी आमच्याकडून पूर्ण सहकार्य राहील.”

कन्नड संघाच्या सचिव आणि कावेरी कलाक्षेत्राच्या प्रमुख मालती कलमाडी म्हणाल्या, “दक्षिण भारतात रस्त्यांवरून चालत आध्यात्मिक आणि भक्तिगीते म्हणण्याची एक सुंदर परंपरा आहे. ही परंपरा पुण्यातही का आणू नये, असा विचार पुढे आला आणि विविधता, एकता आणि सर्वसमावेशकतेचा सुंदर संगम असलेल्या ‘संकीर्तन प्रभात फेरी’ची संकल्पना साकारली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला अतिशय आनंद होत आहे. आमची जन्मभूमी दक्षिण भारत असली, तरी पुणे ही आमची कर्मभूमी आहे आणि या परंपरेला पुण्यात मिळालेला प्रतिसाद मनापासून आनंद देणारा आहे. हा उपक्रम भविष्यात आणखी मोठा आणि व्यापक व्हावा, अशी माझी मनापासून आशा आहे.”

या उपक्रमाची आखणी प्रसिद्ध गायिका नंदिनी राव – गुर्जर व त्यांच्या सहकार्यांनी केली असून त्यांच्यातर्फे  मुलांना विद्यार्थ्यांची आणि सहभागींची पूर्वतयारी व्हावी, यासाठी विशेष बहुभाषिक भजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विविध भक्तिगीतांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रभात फेरीदरम्यान ‘अजम निर्विकल्पम्’, ‘भजा गोविंदम्’, ‘इंद्रायणी काठी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘अबीर गुलाल’, ‘हरी म्हणा तुम्ही’, ‘ताल बोले चिपळीला’, ‘युगे अठ्ठावीस’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’, ‘माझे माहेर पंढरी’ यांसह विविध भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

विविध शाळांतील विद्यार्थी आणि नागरिक एका भक्तिसुरात एकत्र आलेल्या या उपक्रमातून ‘विविधतेत एकता’ या भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्याचा प्रत्यय आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि भक्तीपरंपरेत या अभिनव संकीर्तन प्रभात फेरीने एक आगळा ठसा उमटवला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading