मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक गावात तळ ठोकून आहे. दरम्यान खालावत चाललेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी त्यांना आज सलाईन लावलंय. शरीरातील पाणी पातळी कमी होत असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांची विचारपूस केली. तसच तेथील सुरक्षेचा आढावा देखील घेतला.
आंदोलक आणि पोलिसांमध्ये उद्भवलेल्या संघर्षानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीमधील अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जालना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली. दरम्यान आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे लाठीमार यासंबंधी मनोज जरांगे आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली
दरम्यान, 29 ऑगस्ट च्या दिवशी पैठण फाटा येथे मनोज जरांगेनी आंदोलनाची हाक दिली होती. 31 ऑगस्टला मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असल्याचं सांगत पोलिसांचाआंदोलनात हस्तक्षेप केला. प्रशासन आणि आंदोलक यांच्यात पुन्हा चर्चा झाली. आंदोलकांची तब्येत खालावत असल्याने वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. पहाटे अडीच वाजता गावात अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा शिरला. पोलिसांची दडपशाही होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. 1 सप्टेंबरला पोलीस, महसूल प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चार ते साडेपाचपर्यंत आंदोलकांची समन्वय समिती आणि प्रशासनामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात दोनदा चर्चा झाली पण ती निष्फळ ठरली. पावणे सहा वाजता आंदोलनस्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौज फाटा शिरला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये गोंधळ उडाला. त्यांनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण तापलेले आहे.