उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि डीएमके नेता उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वकिलाने दिलेल्या तक्रारीवरून उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर येथे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म मुळापासून संपवायला हवा, अशा आशयाचं विधान केलं होतं. तर प्रियांक खर्गे यांनी त्या विधानाला सहमती दर्शवत पाठिंबा दिला, असा तक्रारकर्त्याचा आरोप आहे.
एसपी अशोक कुमार शुल्का यांनी सांगितलं की. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याचे आवाहन केल्यानं त्यांच्यावर आणि खर्गे स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 153A, 295A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टॅलिन यांनी शनिवारी तामिळनाडूमध्ये एका कार्यक्रमात सनात धर्माची तुलना डेंगू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. याप्रकरणी राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि भाजपने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसवर हल्ला चढवला होता.
