इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीनिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव
पुणे : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प या दोन्ही मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने दिनांक १ ते ७ सप्टेंबर दरम्यान सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात देशभरातून ८०० कलाकारांचा सहभाग असून जन्माष्टमी निमित्त सुमारे १२०० परिवार भगवंतांना अभिषेक करणार असल्याची माहिती मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संपर्क प्रमुख जनार्दन चितोडे, उत्सव समन्वयक अनंतगोप प्रभू, प्रसाद कारखानीस, भक्ती भोसले आदी उपस्थित होते.
जर्नादन चितोडे म्हणाले, सांस्कृतिक महोत्सवात शास्त्रीय संगीत, भजन, कीर्तन, गायन, नृत्य, नाटिका असे कार्यक्रम होणार असून संपूर्ण देशभरातून सुमारे ९५ सादरीकरणांमध्ये ८०० कलाकार सहभागी होणार आहेत. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली असून भगवान श्रीकृष्णाचे मोहक दर्शन, प्रसाद आणि प्रवचन यांचा आस्वाद भाविकाना घेता येणार आहे.
जन्माष्टमीनिमित्ताने यंदा २.५ ते ३ लाख भाविक दर्शनासाठी येणार
मुख्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव दिनांक ६ आणि ७ सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही दिवस पहाटे ४.३० वाजेपासून रात्री १२.३० वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन खुले असणार आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावरील भव्य मंदिराच्या प्रांगणात ह्या वर्षी सुमारे २.५ ते ३ लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याची शक्यता आहे. दिनांक ७ सप्टेंबर रोजी भगवान श्रीकॄष्णाला अभिषेक करुन, २५० पेक्षा जास्त पक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. या अभिषेकामध्ये दूध, दही, तूप, मध, फळांचा रस इत्यादी सुमारे १०० वेगवेगळ्या द्रव्यांचा समावेश केला जातो. त्यानंतर रात्री १२ वाजता आरती करण्यात येते. तसेच प्रत्येक भाविकाला महाप्रसाद मोफत दिला जातो, असे अनंतगोप प्रभू यांनी सांगितले.
मंदिरात दोन्ही दिवस २४ तास कीर्तन-भजन चालू असणार आहे. जन्माष्टमी निमित्त गीता भागवत तसेच अनेक प्रकारचे ग्रंथ भाविकांसाठी सवलतीच्या दरात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. अनेक प्रकारच्या धार्मिक आणि पूजेच्या वस्तूंचे सुद्धा प्रदर्शन आणि विक्री चालू राहणार आहे. तसेच, इस्कॉनच्या विविध उपक्रमांचे आणि वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतःची वाहने टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात येत आहे.