वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या – खासदार संजय राऊत
मुंबई : देशात वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने त्यासाठीची जोरदार तयारी सुरू केसाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या मनसुब्यावर ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे, असे संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, भाजपकडे अजेंडाच नाही. कोविंद राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. आता त्यांच्याकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीची धुरा दिली आहे. जम्मूत काय चालू आहे? आधी जम्मूत इलेक्शन घ्या, मणिपूरमध्ये घ्या आणि वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन बाजूला करा. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही. हा देश एक आहे ना? वेगळा आहे का? या देशात कोणी वेगळी गोष्ट कशी काय करू शकतो? हा वन नेशनच आहे ना? त्यात काही शंका आहे का? वन नेशन वन इलेक्शन ऐवजी फेअर इलेक्शन घ्या, हा आमचा नारा आहे, असे ते म्हणाले.
संजय राऊत हणाले की, ते फेअर इलेक्शन घेत नाही म्हणून वन नेशन इलेक्शन सुरू केले आहे. लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप राऊत यांनी केला. भाजपवाले इंडियाला घाबरले आहेत. त्यामुळे ते वेगवेगळे फंडे घेऊन येत आहेत. आमचे लक्ष विचलित करण्यासाठी या घोषणा होत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे कारण काय आहे ? तेही गणपती उत्सवात, असा सवाल करत ते म्हणाले की, एरव्ही पंतप्रधान संसदेत येत नाहीत. आता अधिवेशन का? महाराष्ट्रातील खासदार गणपतीत व्यस्त असतात. महाराष्ट्रातील खासदार संसदेत पोहोचू नये म्हणून गणपतीत अधिवेशन घेतले आहे. हा गणेशोत्सवाविरोधात कट आहे. छळ आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
