fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

मासिक पाळीच्या स्वच्छता, आरोग्याविषयी जागृती व्हावी उषा काकडे यांचे प्रतिपादन

पुणे : “मासिक पाळीच्या संदर्भात आजही उघडपणे बोलले जात नाही. याबाबत स्वच्छता आणि आरोग्यविषय जनजागृती व्हायला हवी. सॅनिटरी पॅडचा योग्य वापर आणि वापरानंतर त्याचे विघटन गरजेचे आहे. सॅनिटरी पॅडच्या विघटनासाठी हे इन्सिनरेटर मशीन उपयोगी पडेल,” असे प्रतिपादन ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांनी केले.

कोथरूड येथील दी पूना स्कुल अँड होम फॉर ब्लाइंड गर्ल्स (पुणे अंध मुलींची शाळा) येथे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या सहयोगाने जागृती फाउंडेशनच्या पुढाकारातून बसविण्यात आलेल्या इन्सिनरेटर मशीनचे उद्घाटन काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. प्रसंगी जागृती फाऊंडेशनच्या स्वानंदी रथ-देशमुख, उद्योजिका तृप्ती पिंपळकर, मासिक पाळी आरोग्य मार्गदर्शक डॉ. पूर्वा केतकर, शाळेचे मुख्याध्यापक दामोदर सरगम आदी उपस्थित होते.
उषा काकडे म्हणाल्या, “शारीरिक सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य अधिक महत्वाचे आहे. या मुलींसाठी काम करत असलेल्या या संस्थेचे कार्य मोलाचे आहे. मनापासून प्रयत्न आणि चांगले काम केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. फाउंडेशनच्या माध्यमातून महिला, लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी काम सुरु आहे. ‘गुड टच बॅड टच’ सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पातून आजवर पाच लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. इन्सिनरेटर मशीनमुळे पर्यावरण रक्षण व आरोग्याची सुविधा झाली आहे.”
स्वानंदी रथ म्हणाल्या, “मासिक पाळीच्या आरोग्यासाठी काम करत आहोत. आजवर चौदा हजार दिव्यांग मुलींना मासिक पाळीविषयी जागृती, तसेच सॅनिटरी पॅड वाटप केले आहे. या अंध मुलींना मासिक पाळी काळात स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल.”
डॉ. पूर्वा केतकर म्हणाल्या, “मासिक पाळीच्या वेळी आई-वडिलांचे सहकार्य गरजेचे असते. मासिक पाळी हे स्त्रीला मिळालेले वरदान आहे. त्यामुळे संकोच न करता या विषयावर मोकळा संवाद व्हायला हवा. आपण एकमेकांचे आधार बनून या चार दिवसांत काळजी घ्यायला हवी.”
तृप्ती पिंपळकर म्हणाल्या की, सॅनिटरी पॅड शेकडो वर्षे मातीत विरघळत नाहीत. वर्षानुवर्ष ती तशीच राहतात. त्यामुळे पॅडचे विघटन करावे लागते. या मशीन पर्यावरण पूरक असून, या पॅडची मशीनमध्ये राख होते. त्याचा उपयोग खत म्हणूनही होतो. महिलांप्रमाणे पुरुषांना देखील याची जागृती हवी.”
सविता वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. दामोदर सरगम यांनी संस्थेविषयी, तसेच संस्थेतील मुलींच्या उल्लेखनीय कामगिरी विषयी माहिती दिली व ग्रॅव्हिट्स फाउंडेशन आणि जागृती फाउंडेशनचे या देणगीबद्दल आभार मानले. राधिका रासने यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d