मानसिक स्वास्थ्यासाठी योगोपचार गरजेचे – डॉ. उज्ज्वला चक्रदेव
पुणे : मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधना करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले.
नागपूरच्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे रामभाऊ खांडवेगुरुजी यांच्या ‘योगोपचार‘ ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचे लोकार्पण डॉ. चक्रदेव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. कर्वे रस्त्यावरील एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातील तारापोर सभागृहात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. योगशास्त्रावरील प्रवचनकार, मुपदेशक अशीत आंबेकर, न्यूरोसायकियाट्रीस्ट डॉ. संजय फडके, नागपूरच्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार, ‘योगोपचार‘ ग्रंथांचे सहलेखक अनिरुद्ध गुर्जलवार यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. उज्ज्वला चक्रदेव पुढे म्हणाल्या, योग साधनेतून मिळालेले मानसिक स्वास्थ्य इतरांपर्यंत पोचविण्यासाठी 1994 पासून केलेला संकल्प या ग्रंथामुळे शक्य होणार आहे. मानवी मनाची व्याधी गेली तरच ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण‘ सार्थ ठरेल.
योगाच्या माध्यमातून संपूर्ण समाज मानसिक दृष्टीने उन्नत व्हावा, सामुहिक दृष्टीने प्रगल्भ व्हावा, योगाची चळवळ निर्माण व्हावी, अशी अपेक्षा रामभाऊ खांडवेगुरुजी यांनी व्यक्त केली.
अशीत आंबेकर म्हणाले, समाजोन्नती साधताना आज योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.
डॉ. संजय फडके यांनी खांडवे गुरुजींच्या कार्याचा गौरव रुग्णसेवा यज्ञाची परंपरा असा केला. शरीरासोबतच रोज मनही स्वच्छ ठेवण्याचा मंत्र हा ग्रंथ देतो.
प्रास्ताविक ‘योगोपचार‘ या ग्रंथांचे लेखक अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग, उद्योजक दत्ता देवधर, बापुराव शिरोळकर, महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या पूनम मेहता, चेतना संस्थेच्या संस्थापिका डॉ. नलिनी पाटील, शीतल मोरे, डॉ. भास्कर ईकवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जोशी यांनी केले. आभार मिलिंद वझलवार यांनी मानले.