fbpx
Monday, October 2, 2023
Latest NewsSports

पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब, कल्याण इलेव्हन संघांची विजयाची हॅट्ट्रीक; युनायटेड इलेव्हनचा सलग दुसरा विजय!!

पुणे : स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुणे रेंजर्स क्रिकेट क्लब आणि कल्याण इलेव्हन या संघांनी उत्तम सांघिक कामगिरी करत विजयाची हॅट्ट्रीक नोंदवली. युनायटेड इलेव्हन संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रितेश साळी याच्या अचूक आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड इलेव्हन संघाने स्पार्टन क्रिकेट क्लबचा १९ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना युनायटेड इलेव्हनने २०१ धावांचा डोंगर उभा केला. हर्षल शिंदे याने ८७ धावांची तर, आयुष देव याने ७१ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ५८ चेंडूत १३३ धावांची भागिदारी रचली. या आव्हानासमोर स्पार्टन क्रिकेट क्लबचा डाव १८२ धावांवर मर्यादित राहीला. रितेश साळी याने १५ धावात ५ गडी बाद करून संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.

सुमित दिघे याच्या अचूक गोलंदाजीमुळे पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने रायझिंग स्टार्सचा ७ गडी राखून सहज पराभव केला. रायझिंग स्टार्सने २० षटकामध्ये १५४ धावा धावफलकावर लावल्या. पुणे रेंजर्सच्या सुमित दिघे याने ११ धावात ४ गडी बाद करून रायझिंग संघाचा डाव मर्यादित ठेवला. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबने १४.४ षटकात व ३ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. स्वानंद भागवत (५९ धावा), निखील नासेरी (३८ धावा) आणि अश्‍विन हातेकर (नाबाद ३५ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने विजय साकार केला.

जितेंद्र राऊत याच्या कामगिरीमुळे कल्याण इलेव्हन संघाने सेकंड इनिंग क्लबचा ९ गडी राखून सहज पराभव केला. सेकंड इनिंग क्लबने पहिल्यांदा खेळताना १५२ धावा धावफलकावर लावल्या. कल्याण इलेव्हनने ११.२ षटकात व १ गडी गमावून हे आव्हान पूर्ण केले. जितेंद्र राऊत (नाबाद ७८ धावा) आणि रोहीत गुगळे (६१ धावा) या दोघांनी ५६ चेंडूत १२४ धावांची सलामी देत संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
युनायटेड इलेव्हनः २० षटकात ७ गडी बाद २०१ धावा (हर्षल शिंदे ८७ (३३, ९ चौकार, ६ षटकार), आयुष देव ७१ (४६, ११ चौकार), रोहीत शिंदे ४-२८); (भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी हर्षल आणि आयुष १३३ (५८) वि.वि. स्पार्टन क्रिकेट क्लबः १९.५ षटकात १० गडी बाद १८२ धावा (किरण देशमुख ५८ (३४, ५ चौकार, ३ षटकार), भुषण सवे ३१, किरण दातार १७, रितेश साळी ५-१५, विजय शिंदे २-२८); सामनावीरः रितेश साळी;

रायझिंग स्टार्सः २० षटकात ७ गडी बाद १५४ धावा (सौरभ जळगांवकर २९, विनोद पवार २९, रोशन देओरे नाबाद २२, गौरव बाबर नाबाद ३२, सुमित दिघे ४-११) पराभूत वि. पुणे रेंजर्स क्रिकेट क्लबः १४.४ षटकात ३ गडी बाद १५७ धावा (स्वानंद भागवत ५९ (३२, ६ चौकार, ४ षटकार), निखील नासेरी ३८, अश्‍विन हातेकर नाबाद ३५, पंकज गोपालनी २-२९); सामनावीरः सुमित दिघे;

सेकंड इनिंग क्लबः २० षटकात ५ गडी बाद १५२ धावा (ओंकार सी. ७१ (४५, ३ चौकार, ६ षटकार), कुणाल शेवाळे नाबाद २१) पराभूत वि. कल्याण इलेव्हनः ११.२ षटकात १ गडी बाद १५६ धावा (जितेंद्र राऊत नाबाद ७८ (३४, ६ चौकार, ७ षटकार), रोहीत गुगळे ६१ (३१, ६ चौकार, ४ षटकार); (भागिदारीः पहिल्या गड्यासाठी जितेंद्र आणि रोहीत यांच्यात १२४ (५६); सामनावीरः जितेंद्र राऊत;

Leave a Reply

%d bloggers like this: