दृश्यतेचा प्रवास दुष्टतेकडे जाणारा नसावा : समर नखाते
पुणे ; “चंद्रयान ३ मोहीम आणि त्यातून टिपलेली छायाचित्र ही गौरवास्पद बाब एकीकडे आणि एआय तंत्रज्ञानाचा विकृतीकरणासाठी होणारा वापर ही क्लेशदायक बाब दुसरीकडे. हा तंत्रज्ञानातील विरोधाभास आहे. त्यामुळे दृश्यतेचा प्रवास हा दुष्टतेच्या दिशेने जाणारा ठरतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात हा प्रवास मानवतेच्या दिशेने व्हावा. याची फार मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे.” असे मत एफटीआयआयचे माजी डीन, प्राध्यापक समर नखाते यांनी येथे व्यक्त केले.
श्रीनिवास पतके, गीतेश जोशी, यश उपाध्ये आणि सौरभ बुचके यांच्या कलाकृतीतून साकारलेल्या ‘दुनिया छायाचित्रकारांची’ या दृक् श्राव्य मालिकेचे तसेच ‘कथाचित्र’ या छायाचित्र प्रदर्शनाचे काल त्यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी ते बोलत होते. बालगंधर्व कलादालन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी शिल्पकार भगवान रामपुरे, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर, सुहास असनीकर, विश्वास सोरटे, जयंत जोशी यांसह कला, साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. नखाते यांनी आपल्या सहज आणि ओघवत्या शैलीमध्ये ‘दृश्यता, अभिव्यक्ती आणि संवेदनशीलता’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दृष्टी आणि सृष्टी हे जीवाभावाच नातं. ते नातं तृतीय नेत्रातून अर्थात कॅमेरातून टिपताना त्यामध्ये संवेदनशीलता असेल तर तो प्रवास अधिक उन्नतीकडे नेणारा असतो. मानवतेकडे नेणारा असतो. ज्ञात अज्ञात, चर अचार, मूर्त अमूर्त या पलीकडे जाऊन साधलेली प्रगल्भता ती कलाकृती समृद्ध बनवते. अशी कला बघणाऱ्याच्या काळजाला भिडते. आता प्रत्येकाकडे कॅमेरा आहे,. नेत्र आहे पण ती दृष्टी नाही. म्हणून ती सृष्टी कलेतून उमटत नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘येथील छायाचित्रकारांची प्रत्येक कलाकृती मला चित्राप्रमाणे भासत आहे. हीच कलाकारांच्या कौशल्यातील खरी ताकद आहे,’ अशा शब्दांत भगवान रामपुरे यांनी प्रदर्शनातील सहभागी कलाकरांना प्रोत्साहित केले.
बालगंधर्व कलादालन येथे रविवारपर्यंत सकाळी ११ ते ८ वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. संवाद, स्पर्श आणि कवाड या कथाचित्रातून टिपलेली छायाचित्रे रसिक पुणेकरांच्या पसंतीस उतरत असून यास उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे. दरम्यान, आज (शनिवारी) सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘फोटोग्राफी एक संवादमाध्यम आणि प्रदर्शन’ या विषयावर ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांचे तर पिक्सेल व्हिलेजचे संस्थापक राधाकृष्णन चक्यात यांचे ‘फोटोग्राफीत काळानुरूप होत असलेले बदल’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.