इस्रोचे मिशन आदित्य एल १ येत्या २ सप्टेंबर रोजी होणार लाँच
श्रीहरिकोटा : इस्रोचे मिशन आदित्य एल १ हे २ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल १ हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. इस्रोने चांद्रयान मोहीम यशस्वी करुन इतिहास रचला आहे. त्यानंतर आता सूर्यावर जाण्याची तयारी इस्रोकडून करण्यात येत आहे.
इस्रोचे आदित्य एल १ मोहीम ही सर्वात कठिण मोहिमांपैकी एक आहे.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी म्हटले आहे की, भारताची आता सूर्यावर जाण्याची तयारी सुरु आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताचे मिशन आदित्य एल१ हे सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चांद्रयानावर इस्रोचे लक्ष होते. पण त्याच सोबत इतर काही मोहिमांची तयारी देखील इस्रोकडून करण्यात येत होती. चांद्रयानाच्या महत्त्वकांक्षी मोहिमेनंतर अनेक मोहिमा इस्रोने हाती घेतल्या आहेत. यामधील मिशन आदित्य ही एक आहे. त्यामुळे इस्रोची ही मोहीम देखील चांद्रयानाप्रमाणे यशस्वी होणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.
मिशन आदित्यविषयी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. यावर त्यांनी म्हटले आहे की, ही भारताची पहिलीच सूर्याची मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान सप्टेंबर २ तारखेला लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल १ हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.
काय शिकायला मिळणार?
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल ठेवल्यानंतर ही मोहीम हाती घेतली आहे. तसेच, भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. आदित्य एल-१ अवकाशातील हवामानाची गतिशीलता, कणांचा प्रसार आणि प्रदेश इत्यादी समस्या समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती प्रदान करेल, असा इस्रोच्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. पेलोडचा सूट कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअरची हालचाल, त्यांची वैशिष्ट्ये समजून घेणे सोपे होणार आहे.