Wednesday, May 6, 2026
Latest NewsPUNE

कार्बन न्यूट्रल भारत या वर्षीच गाठले 2030 चे उद्दिष्ट खासदार प्रकाश जावडेकर

पुणे : ‘कार्बन न्यूट्रल भारताच्या मार्गावरील सन 2030 साठी निश्चित केलेले उद्दिष्ट या वर्षीच पूर्ण करण्यात आपण यश मिळविले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या क्षेत्रात जबाबदारीने काम करीत जगासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे मत, खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘ग्रीन तेरे फाउंडेशन’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कार्यशाळेत जावडेकर दृक-श्राव्य माध्यमातून मार्गदर्शन करत होते. पश्चिम भारतातील 30 विद्यापीठांच्या प्रतिनिधींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र शेंडे, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रा. टी. सीताराम यांची प्रमुख उपस्थिती होती.

जावडेकर म्हणाले, ‘कार्बन उत्सर्जनामुळे गेल्या 200 वर्षांत हवामानात बदल होत गेले. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींचे प्रमाणही वाढले. कार्बन उत्सर्जनात अमेरिका, चीन आणि युरोपीय देशांचा वाटा मोठा आहे. आपल्या देशाचे प्रमाण केवळ 3 टक्के इतके कमी आहे. तरीही आपण अधिक जबाबदारीने वागत असून, 2070 मध्ये कार्बन न्यूट्रल देश होण्याच्या दिशेने आगेकूच करीत आहोत.’

जावडेकर पुढे म्हणाले, ‘देशात आता ही चळवळ बनत असून, त्यात विद्यार्थ्यांचा वाटा महत्त्वाचा ठरत आहे. त्यासाठी सुरू केलेल्या ‘कार्बन न्यूट्रल विद्यापीठ आणि महाविद्यालयाचा परिसर’ या उपक्रमात 75 विद्यापीठे सहभागी झाली आहेत. वृक्षारोपण, वीज व पाण्याची बचत आणि कचऱ्यावर प्रक्रिया करून उर्जा निर्मिती अशा कार्यक्रमांतून विद्यापीठांचा परिसर कार्बन न्यूट्रल करण्यावर भर दिला जाणार आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading