डॉ.गोविंद उपाध्याय, प्रा.डॉ.भालचंद्र भागवत यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे : आयुर्वेद टिचर्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या सहयोगाने आयुर्वेदाचे भविष्य २०५० या विषयावर पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक १६ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत शिवदर्शन येथील राजीव गांधी अॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूल येथे ही परिषद होणार आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार नागपूरचे डॉ. गोविंद उपाध्याय आणि पुण्याचे प्रा.डॉ.भालचंद्र भागवत यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राहुल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, डॉ.नितीन वाघमारे, डॉ.अर्पणा सोले, डॉ.प्रदीपकुमार जोंधळे आदी उपस्थित होते.
दोन्ही पुरस्कारार्थींनी आयुर्वेदाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. गोविंद उपाध्याय हे अखिल भारतवर्षीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीचे महामंत्री, भारतीय वैद्यक समन्वय समिती आणि श्री आयुर्वेद कॉलेज नागपूरचे सेक्रेटरी आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. उपाध्याय हे या क्षेत्रात ४० वर्षे कार्यरत असून यांची आयुर्वेदाविषयी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
प्रा.डॉ.भालचंद्र भागवत हे आयुर्वेद विद्यापीठे आणि विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. पुण्यासह कोकणातील विद्यार्थ्यांना देखील त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित शिक्षण दिले आहे. कायाचिकित्सा या विषयात त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी देखील मिळविली आहे. पीएचडीच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल विविध संस्थांनी त्यांना गौरविले आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण व उद््घाटन सोहळा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, बोर्ड आॅफ आयुर्वेद, नवी दिल्ली चे अध्यक्ष डॉ.बी.एस.प्रसाद, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.मिलिंद निकुंभ, बडोदा पारुल विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ.हेमंत तोशिखाने यांसह विविध अभ्यास मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. परिषदेत विविध ३५० हून अधिक शोधनिबंध, पोस्टर्स, शोधप्रबंधांचे सादरीकरण देखील होणार आहे.
आयुर्वेद शैक्षणिक क्षेत्रामध्ये देशभरात कार्यरत प्राध्यापक, संशोधक, चिकित्सक, औषधे कंपनी यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान देखील कार्यक्रमात करण्यात येईल. आयुर्वेदाचे भविष्य २०५० या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद होणार असून आयुर्वेदाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. भविष्यातील आयुर्वेदातील शिक्षणपद्धती, आयुर्वेदातील संशोधन, आयुर्वेद उद्योग, आयुर्वेद चिकित्सापद्धती यांसारख्या अनेक विषयांवर भारतभरातील तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. पुण्यासह नवी दिल्ली, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा येथील आयुर्वेद तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
