Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेसाठी पुणे परिमंडलाचा राष्ट्रीयस्तरावर गौरव

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महावितरणला राष्ट्रीयस्तरावरील सहा पुरस्कारांनी शनिवारी (दि. २९) गौरवण्यात आले.

पणजी (गोवा) येथील कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री  . प्रमोद सावंत यांच्याहस्ते महावितरणचे संचालक (प्रकल्प)   प्रसाद रेशमे, पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता   राजेंद्र पवार यांनी पुरस्कार स्वीकारले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री  भगवंत खुबा, गोव्याचे ऊर्जामंत्री सुदीन ढवळीकर, ‘एआयआरईए’चे अध्यक्ष  साकेत सुरी उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री  खुबा यांनी महावितरणच्या ‘सौर’ योजनेतील कामगिरीचे विशेष कौतुक केले.

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर’ या वेबपोर्टलचे उद्घाटन मा. पंतप्रधान   नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मागीलवर्षी झाले होते. या वेबपोर्टलच्या वर्षपूर्तीनिमित्त पणजी जिमखाना येथे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या (एआयआरईए) वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात छतावरील सौर ऊर्जा योजनेच्या सुलभ व लोकाभिमुख अंमलबजावणीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी महावितरणचे संचालक (प्रकल्प)  प्रसाद रेशमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या योजनेच्या ग्राहक प्रबोधन व जनजागरणासाठी विविध माध्यमांद्वारे केलेल्या कामाची दखल घेत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता  राजेंद्र पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. योजनेसंबंधी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता  दीपक कुमठेकर, नागपूर परिमडंलाचे मुख्य अभियंता  दिलीप दोडके, महावितरण विशेष प्रकल्प कक्षाचे मुख्य अभियंता  चंद्रमणी मिश्रा, कार्यकारी अभियंता  शरद बंड यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुणे परिमंडल अंतर्गत छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या जनजागरणासाठी सातत्याने विविध उपक्रम घेण्यात येत आहे. त्यासाठी उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी समन्वयक म्हणून काम पाहत आहे. दृकश्राव्य माहितीपट, प्रदर्शनी, सौर ऊर्जारथ, ग्राहकसंवाद मोहीम व माहितीपत्रकांचे वितरण, प्रात्यक्षिक, समाजमाध्यमे तसेच प्रसारमाध्यमांद्वारे योजनेबाबत प्रबोधन व जनजागरण सुरु आहे. त्याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली आहे. सौर योजनेच्या वेगवान व प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे परिमंडलातील अभियंता, तांत्रिक कर्मचाऱ्यांसह एजन्सीजच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे परिमंडलामध्ये सध्या १० हजार २०० पेक्षा अधिक ग्राहकांकडील २५४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर आणखी ३ हजार ५०० पेक्षा अधिक ग्राहकांकडे ९६ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांचे काम सुरु आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading