महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कल्याणराव जाधव सभागृहाचे आणि अभ्यासिकेचे ८ ऑगस्टला उद्घाटन
पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या टेरेसवरील कल्याणराव जाधव सभागृहाचे तसेच वा. गो. आपटे संदर्भग्रंथालयातील अभ्यासिकेचे उद्घाटन मंगळवार ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठीचे देणगीदार दुबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ.पी.डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. हा कार्यक्रम मंगळवार ८ ऑगस्ट रोजी सायं. ५.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.
प्रा. जोशी म्हणाले, दुबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव यांनी परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भग्रंथालयाचे नूतनीकरण करून दिले आहे. हे ग्रंथालय वातानूकुलीत करण्यात आले असून ग्रंथ ठेवण्यासाठी उत्तम अग्निरोधक व्यवस्था करण्यात आली आहे. एक लाखाहून अधिक ग्रंथ संपदा असलेले आणि संशोधक, अभ्यासक आणि चोखंदळ वाचक यांचा राबता असलेले कै.वा.गो. आपटे संदर्भग्रंथालय त्यामुळे सर्वांना उत्तम सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहे. लवकरच हे ग्रंथालय पूर्णतः संगणकीकृत होणार आहे. आजवर ग्रंथालयातील पाचशेहून अधिक दुर्मिळ ग्रंथांचे डिजीटायजेशन करण्यात आले असून उर्वरित ग्रंथांचेही लवकरच डिजीटायजेशन करण्यात येणार आहे. याच ग्रंथालयात देणगीदार विनोद जाधव यांचे वडील कल्याणराव जाधव यांच्या स्मरणार्थ अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. ३० विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकणार आहेत तसेच या विद्यार्थ्यांना मसापच्या संदर्भ ग्रंथालयाचाही लाभ घेता येणार आहे. वास्तूविशारद अमृता बर्वे यांच्या सहकार्याने हे नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे.
कल्याणराव जाधव सभागृह
- मसापच्या टेरेसवरील सभागृह
- कविसंमेलने, मुलाखती,वाङ्मयीन गप्पा, पुस्तक प्रकाशने, बैठका, नाटकांच्या तालमी यांसाठी उपयुक्त.
- आसन क्षमता १२५
- सभागृहासाठी उत्तम व्यासपीठ,पोडियम आणि ध्वनी व्यवस्था.
- लवकरच लिप्टची सुविधा उपलब्ध होणार.
