उद्याच्या सक्षम नेतृत्वासाठी संस्कारांची गरज; निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचे मत
गोखले म्हणाले, “प्रत्येक वेळी सरकार सर्व करेल, असे म्हणून चालणार नाही. सरकार आपणच निवडलेले असते. त्यामुळे आपण नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून पुढाकार घेणे आवश्यक आहे. मणिपूर सारख्या घटना मन विषन्न करणाऱ्या आहेत. कोयता गॅंग, वाहनांची तोडफोड, मारामारी..अशा घटनांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आपल्या तरुणांच्या देशात भावी नेतृत्व सक्षम करण्यासाठी युवा मनांना उत्तम संस्कार देणे प्रत्येक नागरिकाने कर्तव्य मानले पाहिजे.”
रुक्मिणी गलंडे यांनी सजग पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद झाल्याचे सांगून, पोलिस सजग राहिले, की नागरिक निर्धास्त राहू शकतात. आपल्या मनात निष्ठा, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश पायाशी येतेच, असे सांगितले. सुप्रिया दामले यांनी प्रास्ताविक केले. सुनीता अभ्यंकर यांनी आभार मानले तर प्राची गोडबोले यांनी वंदेमातरम सादर केले. वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
अन् साकारला २६/११ चा थरार
अंजली कुलथे यांच्याशी नीलिमा बोरवणकर यांनी साधलेल्या संवादातून मुंबईवरील २६ नोव्हेंबर च्या दहशतवादी हल्ल्याचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. कामा हॉस्पिटलच्या नर्सिंग ऑफिसर म्हणून त्या रात्री कर्तव्यावर असणाऱ्या अंजली कुलथे त्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणाल्या, “माझ्यावर तेव्हा प्रसूतीपूर्व कक्षातील २० महिलांची जबाबदारी होती. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी महिला कर्मचाऱ्याला उपचार कक्षात पोचवायचे काम केले. त्यानंतर २० गरोदर महिलांना छोट्या खोलीत एकत्र करून दरवाजा लॉक करून धीर दिला. एकीला कळा सुरू होताच, काळजीपूर्वक लेबर रूममध्ये पोचवले. हे घडताना हल्लेखोर दहशतवादी मी पाहिले होते. पुढे त्यांच्या ओळख परेडसाठी मला बोलवण्यात आले. तेव्हा कुटुंबियांचा विरोध पत्करून मी कसाबला ओळखले. माझ्या गणवेषानेच मला ही प्रेरणा दिली असावी, असे वाटते. आणीबाणीच्या प्रसंगी मला गणवेषाने एक जुनून दिला, स्फूर्ती दिली. माझ्या गणवेषाने हे करवून घेतले, असे वाटते.”
