भगवंताच्या चरित्राचे उच्चारण आणि संतांच्या चरित्राचे आचरण महत्वाचे – ह.भ.प.योगिराज महाराज गोसावी पैठणकर
पुणे : भगवंताच्या गोकुळामधील चरित्राचे वर्णन का करायचे, याचे वेगळे महत्व आहे. भगवंताने इतर ठिकाणी राजकारण केले आहे. मथुरा, द्वारका, हस्तिनापुरात भगवंताने राजकारण केले आहे. ते राजकारण आपल्याला शिकायचे नाही. आम्हाला फक्त भगवंताची बाललिला कानावर पडली, तरी आमच्या मनामध्ये भक्तीचा अंकूर निर्माण होऊ शकतो. भगवंताच्या चरित्राचे उच्चारण आणि संतांच्या चरित्राचे आचरण करणे महत्वाचे आहे, असे संत एकनाथ महाराजांचे वंशज ह.भ.प.योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात कीर्तन महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ हा कार्यक्रम सुरु आहे. समारोपप्रसंगी प्रवचन, कीर्तन महोत्सवाकरिता सेवा देणा-यांचा विशेष सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला.
चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांनी कीर्तने सादर केली. त्यामध्ये मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर, पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नामदास, आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्तबुवा आफळे, नागपूर येथील ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प.योगिराज महाराज गोसावी – पैठणकर यांचा समावेश होता. पुण्यासह आजूबाजूच्या परिसरातून देखील भाविकांनी मोठया संख्येने महोत्सवाला हजेरी लावली होती.
