सुशिक्षित मध्यमवर्गीय नागरिकांची भूमिका ही निर्ढावलेपणाची, निर्बुद्धपणाची – कुमार केतकर
पुणे : आज समाजातील विचारच नाहीसे झाले आहेत, त्यामुळे विचार करणाऱ्या व्यक्तीची समाजातील भूमिका महत्त्वाची ठरत आहे. आज प्रत्येक बुद्धीवंतासमोर हा प्रश्न उपस्थित झाला आहे. निर्ढावलेपणाची निर्बुद्धपणाची भूमिका सुशिक्षित मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये आपल्याला पहायला मिळत आहे. अनिवासीय भारतीय विचारधारेकडून त्यांना समर्थन मिळत आहे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी मांडले.
कुमार केतकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली भांडारकर इन्स्टिट्यूट मधील नवलमल फिरोदिया सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक नंदा खरे यांच्या वैविध्यपूर्ण लेखांचे संकलन व संपादन असलेल्या ‘… नाही मानियले बहुमता’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आशिश पाटकर, पुस्तकाचे संपादन आणि संकलन केलेले विद्यागौरी खरे, मेघना भुस्कुटे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केतकर म्हणाले, “आज मणिपूरमध्ये ज्या घटना घडतायेत किंवा युक्रेनमध्ये जे घडत आहे ते आंतरिक युद्ध आहे. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर ते घडत आहे. या परिस्थितीत विचारवंत किंवा बुद्धीवादी व्यक्ती यांची समाजातील नेमकी भूमिका काय आहे, हेच आज आपल्याला माहिती नाही. ही भूमिका नेमकी कोण वठवत आहे, त्याला समाजाची खरेच काळजी आहे काय, तो विचारवंत आहे का हेच लक्षात येत नाहीये. १९९२ च्या सुमारास अशाच प्रकारे ‘इस्लामोफोबिया’ होता. आता ती जागा चीन घेत आहे इतकाच काय तो फरक.”
आज समाजातील विचारच नाहीसे झाले आहेत, आणि ‘डोन्ट वरी बी हॅपी…’ ही समाजाची म्हणून विचारधारा होत चालली आहे. यामध्ये तुम्ही आनंदी रहा, प्रसन्न रहा हे व्यावहारिक तत्त्वज्ञान राहिले नसून आता ते आध्यात्मिक तत्त्वज्ञान देखील झाले आहे. अनेक आध्यात्मिक धर्मगुरू हेच सांगत आहेत. जग विसरा, समाज विसरा, गरिबी विसरा, दु:ख विसरा, हिंसा विसरा, फक्त आनंदी रहा हेच त्यांचे सांगणे आहे. तुम्ही असे आनंदी राहू शकला तर समाज सुखी राहील हेच ते बिंबवत आहे. जर तुम्ही दु:खाचा, असंतोषाचा प्रसार करत राहिलात तर समाज असंतुष्ट राहील हीच त्यांची शिकवण आहे. आणि हा प्रचार कोणी मजूर, बेरोजगार नागरिक करत नाहीये तर मध्यमवर्गीय नागरिक करतोय. उजवी विचारसरणी हा विचार पसरवित आहे, याकडेही केतकर यांनी लक्ष वेधले.
आज तंत्रज्ञ बनलेले नागरिक चांगले नागरिक झालेले नाहीत. त्यांना सुबत्तेचा विषाणू चावला आहे. यातून चांगले नागरिकत्व त्यांच्यात आलेले नाही. हे खरे यांचे निरीक्षण अतिशय ‘खरे’ आहे. देशात आज ॲलर्जी पसरलेली आहे. ती मणिपूर आणि ठिकठिकाणी दिसून येत आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केली.
परखड लेखाजोखा वाचताना आपण अस्वस्थ होतो. विरोधी मत सहन न करणारे सरकार आज सत्तेवर आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून अविवेक समाजाचा अधिकाधिक भाग व्यापत आहे, याकडे खरे यांनी लक्ष वेधले होते असे सांगत डहाके म्हणाले, “खरेंच लेखन हे केवळ पुस्तकी लेखन नाही तर आजुबाजूच्या प्रश्न व संकटांची जाणीव करून देणारी वस्तुस्थिती आहे. नंदा खरे यांना सगळ्या प्राणिजातांविषयी भावंडभाव वाटत होता. त्यांनी आपल्या लिखाणामधूनही तोच मांडायचा प्रयत्न केला. मात्र यासोबतच इतर कृतींप्रमाणे भाषिक कृतीला त्यांनी महत्त्व दिले. विवेकाच्या जनुकांचा आणि भावंडभावाचा शोध घेणे हा त्यांचा ध्यास बनला होता. भारतात असंख्य लोक निराशावादी होत आहेत हा विचार निराशाजनक नाही तर वस्तुस्थिती निदर्शक आहे हे त्यांनीच मांडले. जग समजून घेत ते कसे बदलता येईल यासाठी त्यांनी लेखन केले. असेही डहाके म्हणाले.
विद्यागौरी खरे यांनी आभार मानले, अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केले तर सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.
