राज्यात लवकरच अजितपर्व? शिंदे यांची सहकुटुंब दिल्लीवारी आणि मिटकरींच्या ट्विट ची जोरदार चर्चा
मुंबई :महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. . त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे होर्डिंग्स लावले आहेत. राष्ट्रवादीतल्या बंडानंतर अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. पुन्हा राजकीय समीकरणं बदलून मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब दिल्ली येथे गेले असून ते पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याने राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ अशा कॅप्शनसह अमोल मिटकरी यांनी एक अजित पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. “आपल्याला जी गोष्ट पटते लगेच त्यासाठी हो म्हणून टाकतो. परंतु कुणीही उठून सांगितली की माफी मागा. तर माफी मागायला मोकार नाही,” असे अजित पवार यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पोहचले आहेत त्यांच्या सोबत पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे आणि संपूर्ण परिवार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमूळे राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना राजकीय वातावरण मात्र तापले आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
