छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : राज्याचे मंत्री, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणा-याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. दरम्यान, धमकी देणा-याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणा-या व्यक्तीने मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. धमकी देणा-या व्यक्तीने स्वत:चे नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले.
त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिसांनी सर्व तपशील घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलने मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक करण्यात आली आहे.
