Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

होरिबा समूहातर्फे स्वच्छ पाण्यासाठी अत्याधुनिक उत्पादन विकसित

पुणे  : प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेल्या जल जीवन मिशनला सक्रिय पाठबळ देण्यासाठी जपानी कंपनी होरिबा समूहाने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक नवे उत्पादन दाखल केले आहे. हिंजवडी येथील कार्यक्रमात होरिबा इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष आणि होरिबा लि. जपानचे कॉर्पोरेट ऑफिसर डॉ. राजीव गौतम आणि होरिबा अॅडव्हान्स्ड टेक्नोचे अध्यक्ष व होरिबा लि. जपानचे ज्युनियर कॉर्पोरेट ऑफिसर डॉ. केंतारो निशिकाता यांच्यासह कंपनीचे नामवंत ग्राहक, वितरक यांच्या उपस्थितीत हे उत्पादन दाखल करण्यात आले.

तेथिस या आघाडीच्या फ्रेंच कंपनीचे अधिग्रहण केल्यानंतर होरिबा अॅडव्हान्सड टेक्नो एसएएसच्या माध्यमातून कंपनीने हे उत्पादन विकसित केले आहे. भारतातील पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रणालीबाबत प्रभावी उपाययोजना प्रदान करण्यासाठी हे उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी ‘जल संवाद: शाश्वत पाणी गुणवत्ता देखरेख आणि व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावरील अभ्यासपूर्ण चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात या क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ यात सहभागी झाले होते.

फ्रेंच कंपनीच्या अधिग्रहणाच्या आधारे होरिबा समुहाने भारतीय आणि सार्क देशांच्या बाजारपेठेत सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन या क्षेत्रात आघाडी घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी यूव्ही-व्हिआयएस, आयन-सिलेक्टिव्ह, कलोरीमेट्री आणि एनडीआयआर तंत्रज्ञान आदी उपाययोजना पुरवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. अशा उपाययोजनांच्या आधारे पाण्याच्या गुणवत्तेचे पीएच, बीओडी, सीओडी, टीएसएस, अमोनिया, नायट्रेट, एकूण सेंद्रिय कार्बन पदार्थ आणि इतर अनेक निकषांच्या सहाय्याने परीक्षण करण्यास मदत मिळेल. पाण्याची गुणवत्ता मोजण्यासाठी अत्याधुनिक प्रणालींचे संशोधन आणि विकासासही यामुळे चालना मिळणार असून औद्योगिक कंपन्यांनाही उत्तम उपाययोजनांचे पर्याय उपलब्ध होतील. यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानात वर्चस्व असलेल्या तेथिसच्या अधिग्रहणामुळे इलेक्ट्रोकेमिकल आणि सॅम्पलिंग कोअर तंत्रज्ञानाची मालकी असलेल्या होरिबा अॅडव्हान्सड टेक्नो कंपनीला चांगला लाभ होईल. याशिवाय, होरिबा नॉनडिस्पर्सिव्ह इन्फ्रारेड (एनडीआयआर) आणि ज्वलन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहे.

यावेळी बोलताना होरिबा इंडिया लि.चे अध्यक्ष डॉ. राजीव गौतम म्हणाले, “ प्रचंड लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात पाण्याची गरजही प्रचंड आहे. त्यामुळे नद्या आणि जलस्रोतांचे अचूक निरीक्षण करणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाचे जपानी तंत्रज्ञान प्रदान करून होरिबा या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. आता तेथिसच्या अधिग्रहणामुळे कंपनीची जलव्यवस्थापनासाठी आवश्यक उत्पादनांची श्रेणी आणखी मजबूत होईल.”

यावेळी बोलताना डॉ. केंतारो निशिकाता म्हणाले, “जगातील पाण्याचे संरक्षण करणे आहे, हे होरिबाचे उद्दिष्ट असून, भारतातील ग्रामीण आणि शहरी भागाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवणे हेदेखील तिचे ध्येय आहे. जागतिक पर्यावरण, सजीवसृष्टी आणि उद्योग या सर्वच क्षेत्रांमध्ये पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. होरिबा आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पाण्याशी संबंधित विविध समस्यांवर उपाय प्रदान करत आहे. जगभरातील पाण्याच्या गुणवत्तेचे रक्षण करणे आणि सर्व लोकांना स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवणे यावर कंपनीचा भर आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading