संतरचनांच्या वर्षावात रसिक चिंब
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे आयोजित ‘संतवाणी‘ कार्यक्रमात पंडित हेमंत पेंडसे आणि पंडित रघुनाथ खंडाळकर यांनी सादर केलेल्या संतरचनांनी रसिकांना भक्तिरसाची अनुभूती आली. संस्थेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात हा कार्यक्रम झाला.
गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर, उपाध्यक्ष रवींद्र आपटे, कोषाध्यक्ष डॉ. मोहन उजगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘संतवाणी‘ची सुरुवात पंडित खंडाळकर यांनी ‘जय जय रामकृष्ण हरी‘ या पारंपरिक गजराने केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजरचित ‘वाचे विठ्ठल गाईन‘ ही स्वत: संगीतबद्ध केलेली रचना ऐकवून रसिकांची मने प्रफुल्लीत केली. तर संत एकनाथ महाराजरचित ‘एकदा जा रे अलंकापुराला जन्म येरझारा चुकवाया‘ या रचनेने आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखविला. ‘खेलने ना जाऊ मैय्या गोपियां खिजावे‘ या संत सूरदासांनी रचलेल्या रचनेला पहाडी रागात गुंफून केलेल्या सादरीकरणाने गोपींच्या चेष्टेने हैराण झालेल्या श्रीकृष्णाने आपल्या यशोदा माईला केलेल्या लाडीक तक्रारींचे दर्शन त्यांनी घडविले. ‘एके दिवशी शारंगपाणी खेळत होता राजभुवनी‘ या संत एकनाथ महाराज यांच्या गवळणीला गझल अंगाने चढविलेल्या स्वरसाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचा उत्तरार्ध भक्तिरसात रंगला तो पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या भावार्थपूर्ण भक्तिरचांनी. पंडित पेंडसे यांनी सादरीकरणाची सुरुवात ‘आम्ही विठ्ठलाचे वारकरी‘ या रचनेने केली. संत सोयराबाई यांची सुप्रसिद्ध ‘टाळ दिंडीचा गजर‘ ही गोरखकल्याण रागात संगीतबद्ध केलेली रचना उपस्थितांची विशेष दाद मिळवून गेली. गुरू पंडित अभिषेकी बुवांच्या सांगीतिक संस्कारांची आठवण जागवत त्यांनी सादर केलेल्या ‘रंग रंगीली राधा‘, ‘विष्णुमय जग‘, ‘अवघे गर्जे पंढरपूर‘ या रचनांनी रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले. कवी विठ्ठल नगरकर यांच्या ‘सकळ विश्वाचे माहेर‘ या रचनेला पंडित पेंडसे यांनी संगीतबद्ध केले आहे. ही रचना त्यांचे शिष्य तेजस मेस्त्री यांनी तयारीनिशी सादर केली. मंगल गुजरी व भैरवीचे मिश्रण असलेल्या ‘मनावर गोंदलेले सावळे काहूर एक झाला सारा रंग एक लय सूर‘ ही रचना संतवाणीचा कळसाध्याय ठरली.
कलाकरांना पांडुरंग पवार, स्वानंद कुलकर्णी, सुरंजन खंडाळकर, प्रथमेश तारळकर, अनिल भुजबळ, चैतन्य पवार यांनी साथसंगत केली. ऋतुजा फुलकर यांचे निवेदन होते.
सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांच्या हस्ते पंडित पेंडसे व पंडित खंडाळकर यांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. जावडेकर यांनी दोन्ही कलाकारांना दीर्घायुरोग्य चिंतून त्यांचा पुढील सांगीतिक प्रवास उज्ज्वल, दैदिप्यमान असावा अशा शुभेच्छा दिल्या. निवेदिका ऋतुजा फुलकर यांनी दोनही कलाकारांशी संवाद साधला. त्यावेळी पंडित खंडाळकर म्हणाले, ज्याप्रमाणे पांडुरंगाच्या मंदिरात सेवा करायला मिळणे हे भाग्य असते त्याप्रमाणेच या स्वरमंदिरात सादरीकरणाची संधी मिळाली हे माझे परमभाग्य आहे. पंडित पेंडसे यांनी आपले गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक संस्कारांमुळे आपल्या हातून अनेक रचनांना संगीतबद्ध करण्याचे कार्य घडत आहे, असे नम्रतापूर्वक नमूद केले.
