डॉ. अरुणा ढेरे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर
श्याम जोशी यांचा विशेष सन्मान
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १५ जुलै रोजी (शनिवार) सायं. ६.०० वा. एस. एम. जोशी फौंडेशन सभागृह येथे होणाऱ्या समारंभात संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अभय टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. यशवंत पाटणे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेले, बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, “महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. तीन दशकाहून अधिक काळ व्रतस्थ वृत्तीने आणि निष्ठेने डॉ. अरुणा ढेरे यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ. ढेरे यांच्या विषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे.”
ग्रंथसेवेचा आदर्श वस्तुपाठ निर्माण करतानाच बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांनी पाच दशकाहून अधिक काळ महाराष्ट्रात वाचनसंस्कृती समृद्ध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत. श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जोशींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
