Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsMAHARASHTRA

बीपीसीएलतर्फे महाराष्ट्रातील ३० वंचित मुलांना कॉक्लियर प्रत्यारोपणासाठी मदत

मुंबई : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या आघाडीच्या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने महाराष्ट्रातील कर्णबधिर मुलांसाठी लक्षणीय उपक्रम हाती घेतला आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा (सीएसआर) भाग म्हणून हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमासाठी कंपनीने इंदौरवाला मेमोरियल एज्युकेशनल अँड मेडिकल इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर (आयएमईएमआयआरसी) यांच्यासह भागिदारी केली आहे. हे सेंटर राज्यातील ३० वंचित मुलांसाठी कॉक्लियर (ऐकू येण्यासाठी मदत करणारे उपकरण) प्रत्यारोपण सेवा पुरवणार आहे.

कॉक्लियर प्रत्यारोपण प्रक्रिया कानाच्या अंतर्गत भागात बिघाड झालेल्या आणि बाहेरून हियरिंग एड लावू न शकणाऱ्यांसाठी वरदान समजली जाते. या उपक्रमाची सूत्रे आयएमईएमआयआरसीने हाती घेतलेली आहेत. वेळीच उपचार करत श्रवणक्षमतेचा आणखी ऱ्हास होऊ न देता आर्थिकदृष्ट्या वंचित व जन्मतः कर्णबधिर मुलांना लाभ करून देण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे.

हा उपक्रम बीपीसीएलच्या आरोग्यसेवा व स्वच्छता कार्यक्रमांअंतर्गत हाती घेण्यात आला असून नाशिक व महाराष्ट्रातील काही ठिकाणी या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

प्रसिद्ध भारतीय क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेट खेळाडू संजय मांजरेकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी लाभार्थींबरोबर संवाद साधला तसेच आपले अनुभव सांगत प्रत्यारोपण झालेल्या व ती करणार असलेल्या मुलांना दिलासा दिला.

संजय मांजरेकर म्हणाले, ‘क्रिकेट क्षेत्रातील काही अविस्मरणीय क्षण अनुभवण्याचं भाग्य मला लाभलं. या खेळात विजय धूमधडाक्यात साजरा केला जातो व लक्षात ठेवला जातो, मात्र इथे कॉक्लियर प्रत्यारोपणाद्वारे मला रोजच्या आयुष्यात चमत्कार कसा घडतो हे पाहायला मिळालं. हे खरंच विलक्षण आहे. ही मुलंच खरे हिरो आहेत आणि कर्णबधिरपणावर मात करण्याची त्यांची जिद्द कौतुकास्पद आहे. त्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण टीमचे प्रयत्न खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहेत. अशा हिरीरीने काम करणाऱ्या टीमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे अतुलनीय काम बीपीसीएल करत आहे. या कामात सहभागी असलेल्या प्रत्येकाला मी शुभेच्छा देतो.’

आयएमईएमआयआरसी ही चॅरिटेबल संस्था असून त्यांच्यातर्फे इंदौरवाला ईएनटी हॉस्पिटल हे नाशिकमधील अत्याधुनिक स्पेशॅलिटी केयर सेंटर चालवले जाते. हे आयएसओ ९००१:२००० प्रमाणित सेंटर असून कॉक्लियर प्रत्यारोपणासाठी उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हे सेंटर २०१६ पासून केंद्र सरकारच्या कॉक्लियर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपक्रम हाताळणाऱ्या एडीआयपी योजनेअंतर्गत (असिस्टन्स टु डिसेबल्ड पर्सन्स फॉर पर्चेसिंग/फिटिंग ऑफ एड्स/अप्लायन्सेस) समाविष्ट करण्यात आले आहे.

या उपक्रमामध्ये वंचित मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याची महत्त्वाची क्षमता आहे. कॉक्लियर प्रत्यारोपणाला मदत करत बीपीसीएल आणि आयएमईएमआयआरसीने या मुलांना सक्षम करण्याचे व त्यांना निरोगी आयुष्य जगण्याची संधी देण्याचे ध्येय ठेवले आहे.

वंचितांना वाजवी किंवा मोफत सेवा देणे तसेच त्यांना दर्जेदार ईएनटी सेवा उपलब्ध करून देणे ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. शस्त्रक्रियेपूर्वी लाभार्थींची आरोग्य तपासणी केली जाते. त्यामध्ये ऑडिओलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि मानसिक मूल्यांकनाचा समावेश असतो.

कॉक्लियर प्रत्यारोपण करणाऱ्या सर्जन्ससह चर्चा करून उमेदवाराची शारीरिक क्षमता तपासली जाते, कारण कॉक्लियर प्रत्यारोपणामध्ये न्युरोप्रोस्थेसिस/इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे प्रत्यारोपण केले जाते, ज्यामुळे श्रवणेंद्रियाची क्षमता सुधारते.

या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील ३० वंचित मुलांवर कॉक्लियर प्रत्यारोपण केले जाईल व त्यानंतर आवश्यक काळजी घेतली जाईल.

समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी बीपीसीएल बांधील आहे. कॉक्लियर प्रत्यारोपण उपक्रमासाठी आयएमईएमआयआरसीसह सहकार्य करत बीपीसीएलने महाराष्ट्रातील वंचित मुलांचे स्वास्थ्य आणि विकासासाठी योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading