लावणी कलावंत आणि बॅकस्टेज महिला आर्टिस्ट यांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप
पुणे : महिलांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी कशिश सोशल फाउंडेशन अग्रेसर आहे. दुर्गम, स्लम भागातील व अन्य दुर्लक्षित क्षेत्रातील महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी फाउंडेशन विविध उपक्रम राबवित असते. त्या अंतर्गत कशिश सोशल फाउंडेशन आणि बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणी कलावंत आणि नाट्य क्षेत्रातील बॅकस्टेज महिला आर्टिस्ट यांना ५ हजारांहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार,पुजा वाघ, डॉ श्रद्धा जवंजाळ,अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, कला क्षेत्रातील महिलांचे आरोग्य विषयक अनेक प्रश्न आहेत, जागरण, प्रवास यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते, यातून मोठे आजार होण्याचा धोका असतो. कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे यामुळे बालगंधर्व परिवार यात सहभागी झाले.
उपक्रमांबद्दल बोलताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने दुर्गम, स्लम भागातील आणि दुर्लक्षित क्षेत्रातील एक लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जाणार आहेत, त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात लावणी कलावंत आणि बॅकस्टेज महिला आर्टिस्ट यांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटप आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अलीकडच्या काळात अनेक महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध म्हणून एचपीव्ही लसीकरण केले जाते. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस लस (HPV) ही विशिष्ट प्रकारच्या मानवी पॅपिलोमाव्हायरसच्या संसर्गास प्रतिबंध करणारी लस आहेत. उपलब्ध HPV लस एकतर दोन, चार किंवा नऊ प्रकारच्या HPV पासून संरक्षण करतात. सर्व HPV लसी किमान HPV प्रकार १६ आणि १८ पासून संरक्षण करतात, या लस साठीही या महिलांची नोंदणी फाउंडेशच्या वतीने करण्यात आली असे योगेश पवार यांनी सांगितले.
