मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत गुरुकुलाचा देखावा
पुणे : मुरलीधर लोहिया मातृमंदिर (डीईएस पूर्व प्राथमिक) शाळेत प्राचीन गुरुकुलाचा देखावा सादर करण्यात आला होता. गुरू, शिष्य, गाय-वासरू, तुलसी वृंदावन, वृक्ष-वेली, आश्रम, विहीर आदींचा देखाव्यात समावेश होता. काही विद्यार्थ्यांनी ऋषिमुनींच्या वेशभूषा केल्या होत्या.
आईंचे पहिला गुरू म्हणून पूजन करण्यात आले. त्यानंतर मातांनी मुलांच्या हाताला धरून पाटीवर ‘श्री गणेशा’ लिहून घेतले. मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्लोक आणि प्रार्थना म्हणण्यात आल्या. शिक्षकांनी गुरू-शिष्याच्या गोष्टी सांगितल्या. पालकांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राचीन भारतीय ज्ञानसंपदा आणि अधुनिक तंत्रज्ञान यांचा शिक्षणात समावेश असला पाहिजे, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून गुरुपौर्णिमेनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
