Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

सामाजिक दृष्टी देण्याचे कार्य समाजात व्हायला हवे – कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी

पुणे : निराश्रीत, विधवा, कष्टकरी, तळागाळातील, मागासलेल्या वर्गासाठी कार्य करणे गरजेचे आहे. केवळ मदत न देता, त्या वर्गाच्या यशानंतर त्यांचे कौतुक देखील होणे गरजेचे आहे. याप्रकारचे कार्य शांताई सारख्या महाराष्ट्रातील सामाजिक संस्था करीत आहेत. दृष्टी असेल तर आपल्याला सगळे दिसते. कोणतीही गोष्ट पाहून आपण ती आत्मसात करतो. ती सामाजिक दृष्टी देण्याचे कार्य समाजात व्हायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले.

शांताई संस्थेतर्फे येरवडा येथील शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झेप पुरस्कार वितरण सोहळा, गुणवंत विद्यार्थी व आदर्श मातांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष अरुण वाघमारे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, बिशप थॉमस डाबरे, सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख, व्याख्याते दत्ता कोहिनकर, संस्थेचे अध्यक्ष बाप्पू कांबळे, संचालिका रश्मी कांबळे, फादर रॉबिन, अमोल राजगुरू, राजू गायकवाड, सुहास राजगुरू, अनिरुद्ध हळंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देखील देण्यात आले.

शांताई जीवनगौरव पुरस्कार गुलामअली सोमाजी, अ‍ॅड. टेÑव्हर आयझॅक, उषा वाजपेयी, समाज भूषण पुरस्कार प्रशांत वाघमारे, पूजा आनंद, जितेश खरात, झेप पुरस्कार सिद्धार्थ भांगे, अतुल गायकवाड, विशेष पुरस्कार मनीष भोसले, नील परब व निखील परब यांना प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.

डॉ.दिलीप पाटील भुजबळ म्हणाले, समाजातील वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांकरिता सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत असणे गरजेचे आहे. माणसाचे आयुष्य अनमोल आहे. त्या काळात अनेक गोष्टी आपण करु शकतो. फक्त समाजासाठी कार्य करण्याची तळमळ असणे गरजेचे आहे.

बाप्पू कांबळे म्हणाले, शिक्षणाची गंगा तळागाळात पोहोचविण्याकरीता आम्ही कार्यरत आहोत. त्यासोबतच घरातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याकरिता पाठबळ देतो. शांताई संस्था विद्यार्थी, महिलांना मदतीचा हात देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न गेल्या २० वर्षांपासून करीत आहे. जीवनात प्रेरणा मिळावी आणि आत्मविश्वास मिळावा, याकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो.

दत्ता कोहिनकर म्हणाले, संकटाला तोंड दिले तर संकटे दूर पळून जातात. संकटाला तोंड देण्यासाठी आपली तब्येत धष्टपुष्ट असायला हवी. त्याकरिता रोज व्यायाम करायला हवा. शरीराने बलवान व मनाने सबल असाल, तर आपण यशस्वी होऊ. पुस्तकी ज्ञान म्हणजे करिअर नाही. मुलांचे शरीर, मन कसे आहे, हे पाहण्याकरिता मुलांना बाहेरच्या जगात पाठवायला हवे. मुले कोणाच्या संगतीत राहतात, त्यावर त्यांचे करिअर व यशस्वीता ठरते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading