सायली अगावणे, आर्यन राठोड यांना यंदाचा कसबा गौरव पुरस्कार
पुणे : श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा गौरव पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नृत्यांगना सायली अगावणे, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन राठोड यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ३१ मे रोजी सायंकाळी ५.१५ वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी व अनघा दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला सहाय्यक सहकारी वसुधा वडके, अपेक्षा राऊत, प्रीती नायकवडी, आर्या परदेशी चैत्राली सरमहाले, नामदेव समाज उन्नती परिषद पुणे अध्यक्ष संदीप लचके, कौस्तुभ आगवेकर, पियुष शहा, विजय घाणेकर, गौरी गुमास्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार पत्रकार सारिका रोजेकर आणि नाट्य प्रशिक्षक अमृता जोगदेव यांना तसेच बाल गौरव पुरस्कार आहान मोदी व जिम्नॅस्टिक्स खेळाडू अहिल्या आदमणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाला माताजी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती या अध्यक्षस्थानी असून सामाजिक कार्यकर्ते डॉ.मिलिंद भोई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच कसबा नगर संघप्रमुख डॉ.दीपक रोकडे, केशव शंखनाद पथक संस्थापक नितीन महाजन, कल्पना जाधव, संदीप लचके, सीमा सरदेशपांडे, किरण सरदेशपांडे, मुरलीधर देशपांडे, प्रल्हाद गवळी आदींची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला असणार आहे.
अनिल दिवाणजी म्हणाले, कार्यक्रमात चैतन्य हास्ययोग मंडळ, त्वष्टा कासार समाज वाचन मंदिर, लेखक रविंद सातपुते आणि मॉडेल कॉलनीतील अजिंक्य मित्र मंडळ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याकरिता गौरविण्यात येते.
अनघा दिवाणजी म्हणाल्या, पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि सुसंस्कारसंपन्न भावी पिढी निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बालसंस्कार केंद्र चालविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
