Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

बुजुर्गांचे घरंदाज सादरीकरण आणि युवा प्रतिभेचे दर्शन घडवणारा महोत्सव संपन्न

पुणे : बुजुर्ग कलावंतांचे घरंदाज सादरीकरण आणि उमलत्या प्रतिभेचे दर्शन घडवणारे कलाविष्कार, हे उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. सुंद्री, सतार, सरोद अशा वाद्यांचे वैविध्य या निमित्ताने रसिकांना अनुभवता आले.

पुण्यातील सुहाना बसंत फाउंडेशन आणि कन्नड संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सितार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात हा महोत्सव संपन्न झाला. हा दोन दिवसीय महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला होता. या महोत्सवाचे हे पाचवे वर्ष होते.

सितार नवाज उस्ताद बाले खान यांचे घराणे ‘सताररत्न’ पदवीने ओळखले जाते. सतार हे वाद्य दक्षिण भारतात रुजविण्यात त्यांच्या घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी या घराण्याचे सातव्या पिढीचे कलाकार उस्ताद बाले खान यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध सतारवादक व गायक रईस बाले खान  या महोत्सवाचे आयोजन करतात, अशी माहिती संयोजकांनी दिली.

१ जुलै रोजी सायं ५ वाजता पं. भीमण्णा जाधव यांच्या सुंद्री वादनाने महोत्सवाला सुरवात झाली. भीमण्णा जाधव हे सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू व पंडित चिदानंद जाधव यांचे चिरंजीव आहेत. सुंद्री वाद्यास सातासमुद्रापलीकडे पोहचविण्यात भीमण्णा यांचा मोठा वाटा आहे. भीमण्णा जाधव यांचे सुपुत्र व्यंकटेश कुमार यांचाही सादरीकरणात सहभाग होता. समयोचित अशा राग मधुवंतीची पेशकश पं. भीमण्णा यांनी केली. त्यांना डॉ अतुल कांबळे तबल्यावर साथ केली. सुंद्री या वाद्याचे अनोखे नादसौंदर्य त्यांच्या वादनातून उलगडले. द्रुत तीन तालात एक धूनही त्यांनी सादर केली.

यानंतर विदुषी कल्पना झोकरकर यांचे गायन झाले. कल्पना झोकरकर या ग्वाल्हेर घराण्याच्या सुप्रसिद्ध व ज्येष्ठ गायिका. त्यांनी राग श्री मांडला. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे सुरेल दर्शन घडवत त्यांनी रागाची मांडणी केली. गौडमल्हार रागातील बंदिश सादर केल्यावर त्यांनी काफी मधील टप्पा सादर केला. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता उस्ताद उस्मान खान यांच्या सतारवादनाने झाली. त्यांनी राग किरवाणी पेश केला. आलाप, जोड, झाला अशा पद्धतीने त्यांचे अनुभवसिद्ध वादन उत्तरोत्तर रंगत गेले.  त्यांना पं रविंद्र यावगल यांनी तबल्याची ढंगदार साथ केली.

महोत्सवाचे दुसरे सत्र २ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता सुरू झाले. भेंडी बाजार घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आणि पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या अनुराधा कुबेर यांनी राग मुलतानी मांडला. विलंबित एकतालातील रचना त्यांनी सादर केली. नैना नीर झरत…’ ही त्रितालातील रचना आणि त्यानंतर राग गौडसारंगमध्ये ‘कदंब की छैया’ हा झपताल मांडला. भोला तू ऐसा काहे बने रे’ या एकतालातील रचनेने त्यांनी गायनाची सांगता केली. त्यांना पं रविंद्र यावगल यांनी तबल्याची तर डॉ चैतन्य कुंटे यांनी संवादिनीची साथ केली.

यानंतर पं. उदय भवाळकर यांचे धृपद गायन झाले. राग गावतीमध्ये चौतालात ‘करम कर दीजो मोरे साई’ ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यांच्या नोमतोम आणि आलापचारीतून सुंदर वातावरणनिर्मिती झाली. त्यांना प्रताप आवाड यांनी पखावजची साथ केली.

यानंतर उस्ताद रफिक खान (सतार) आणि अभिषेक लाहिरी (सरोद) यांची जुगलबंदी रंगली. उस्ताद रफिक खान हे धारवाड घराण्याच्या सहाव्या पिढीचे वादक आहेत तर अभिषेक लाहिरी हे मेहर घराण्याचे सुपासिध्द सरोद वादक आहेत. अभिषेक लाहिरी यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले असून ग्लोबल इंडियन म्युझिक पुरस्कारासाठी त्यांना दोन वेळा नामांकने मिळाली आहेत. राग श्री मध्ये त्यांनी आलाप, जोड सादर केले. झपतालातील त्यांचे वादन जनानी आणि मर्दानी बाज, यांची वैशिष्ट्ये दर्शवणारे होते. परस्परांना पूरक अशा स्वरसंगतींनी आणि सवाल जबाबांनी हे वादन रंगतदार ठरले. या दोघांना पं रामदास पळसुले यांनी दमदार तबलासाथ केली.

ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप झाला. त्यांनी राग बागेश्रीमध्ये विलंबित एकतालाच्या माध्यमातून रंग भरले. दोन्ही घराण्याच्या गायकीचे अंश त्यांच्या गायनातून रसिकांनी अनुभवले. त्यांना पं. रविंद्र यावगल यांनी तबल्याची तर डॉ चैतन्य कुंटे यांनी संवादिनीची साथ केली. महोत्सवाचे सूत्रसंचालन अनघा परांजपे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading