Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदारांची उद्या बैठक

 

संघटना सांभाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर हाती घेतल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना सावरण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या दृष्टीने उद्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने केली जात आहे. विशेषतः शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाठ वारंवार जाहीरपणे याचा उल्लेख करत आहेत. ऑपरेशन टायगर होणार हे निश्चित. मात्र, ते कधी होणार हे स्वतः एकनाथ शिंदे ठरवतील असा त्यांचा दावा आहे.

दुसरीकडे, धाराशिव येथे कालच पार पडलेल्या ठाकरे गटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला खुद्द खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली. नागेश पाटील आष्टीकर यांनी तर खुद्द एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. खासदार संजय पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली या घटनेची ही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर शिंदे गट ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी गळ टाकून बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला, विशेषतः भाजपाला रोखण्यात महाविकास आघाडीला उल्लेखनीय यश मिळाले. या निवडणुकीत सर्वाधिक फायदा ठाकरे गटाला झाला. मात्र, त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे पालटले. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने ठाकरे गटाच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना गळती लागली. त्याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसला. ती गळती अद्यापही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना सांभाळण्यात उद्धव ठाकरे यांना कितपत यश येते याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading