Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

मराठी नाटकांची पत – प्रतिष्ठा वाढवण्याचे आव्हान – प्रशांत दामले

पुणे – नाटकांबरोबरच आता टीव्ही, ओटीटी, चित्रपट अशी अनेक माध्यमे सध्या आहेत. पूर्वी कलाकाराचा प्रवास हा रंगभूमीवरून पडद्यावर होत असे. सध्या या क्षेत्रात येणारे कलाकार आपल्याला टीव्हीवर जायचे असे काहीतरी ठरवूनच या क्षेत्रात येतात. त्यामुळे आता प़डद्यावरून रंगभूमीवर असा प्रवास सध्याचे तरूण कलाकार करताना दिसतात. आपण मराठी नाटकात काम करतो हे सांगणे अभिमानास्पद वाटवे यासाठी मराठी नाटकांची पतप्रतिष्ठा वाढवणे हे नाट्यपरिषदेचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोरचे मोठे आव्हान आहे असे ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले यांनी आज येथे सांगितले.
अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत दामले यांचा नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात दामले यांचा पुणेरी पगडी, उपरणं देऊन सत्कार केला. नाट्यपरिषदेसाठी कोथरूड शाखेने दिलेल्या १२५०० रूपये देणगीचा धनादेश त्यांना सुपूर्त केला. यावेळी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, सहकार्यवाह समीर हंपी आणि सत्यजीत धांडेकर, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

प्रशांत दामले म्हणाले, रंगभूमीवर अभिनय करणे सोप नाही. इथे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले नाही तर सरळ प्रेक्षकच कलाकाराला निवृत्त करतात. त्यामुळे मी नव्याने येऊ इच्छिणा-यांना शिक्षण पूर्ण करा मग या क्षेत्रात या असे आवर्जून सांगतो. आजही चांगलं लेखन करणारे बरेचजण आहेत पण त्यांना लेखनाला प्रोत्साहित करण्यासाठी नाट्य निर्मात्यांनी तुम्ही लिहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास देणे आवश्यक आहे. राज्यात असलेल्या नाट्यगृहांपैकी 48 ठिकाणी नाटकांचे प्रयोग करता येतात. नाट्यगृहांमधील कमतरतांबाबत 28 थिएटर्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या नाट्यगृहांची देखभाल हे काम फारच जिकीरीचे असून ही सर्व नाट्यगृहं दुरूस्तीदेखभालीसाठी एका छताखाली असणे आवश्यक आहे शासनाच्या अधिका-यांनीही आता मान्य केले आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल.

नाट्यपरिषदेचे मुंबईत असलेल्या नाट्यसंकूलाचे काम साठटक्के पूर्ण झाले असून उर्वरीत काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगून ते म्हणाले, मुंबईत येणा-या रंगकर्मींची सर्वात मोठी अडचण ही मुंबईत मुक्काम करण्याची आहे. ही अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केल आहेत. नाट्यसंकूलातील एक ह़ॉल ऐंशी आसन क्षमतेचा असून ते वातानुकूलीत करून तेथे हौशी नाटकांचे प्रयोग, नाटकाच्या तालमी, लहान कार्यक्रम यासाठी उपयोग करायचा आहे. राज्य एकांकीका स्पर्धामध्ये पहिल्या तीन आलेल्या एकांकीकांचे प्रयोग अन्य राज्यात करण्यासाठी विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. लवकरच असे प्रयोग पुन्हा अन्य राज्यात सुरू होतील. राज्यातील सरकारी विद्यापीठातील परफॉर्मिंग आर्टस विभागाला राज्यशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आळेकरसरांना घेऊनच शासनाच्या अधिका-यांची भेट घेण्यात येईल.
सतीश आळेकर म्हणाले, प्रशांत हा गेली अनेक वर्षे या रंगभूमीवर काम करत आहे. तो स्वत: नाट्यनिर्माताही आहे. त्यामुळे त्याला नाटक या व्यवसायाच, उद्योगाची किंवा धंद्याची आंर्तबाह्य महिती आहे. त्यामुळे नाट्यपरिषदेचा अध्यक्ष म्हणून तो चांगलं काम करू शकेल असा मला विश्वास आहे. हौशी, प्रायोगिक आणि व्यवसायिक रंगभूमी असे रंगभूमीचे वेगवेगळे भाग जरी असले तरी हे सर्व एकमेकांना पूरकच आहेत. व्यवसायिक नाटकाला येणा-या प्रेक्षकांमधूनच काही प्रेक्षक हौशी रंगभूमीवरची नाटकं बघायला येत असतात. एकूणच रंगभूमी ही सन १८४८ किंवा त्यापूर्वीपासून ते आजपर्यंत लोकाश्रयावरच चालत आलेली आहे. या व्यवसायाला स्थैर्य देण्यासाठी खाजगी कंपन्यांच्याकडून नियमितपणे काही मदत मिळवता येईल का यासाठी नव्या अध्यक्ष व कार्यकारिणीने प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
प्रस्ताविक करताना सुनील महाजन म्हणाले, नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेच्यावतीने दरवर्षी अनेक उपक्रम राबवले जातात. दरवर्षी यशवंतवेणू पुरस्कार देण्यात येतो. करोनाच्या काळात पडद्यामागच्या कलाकारांना सर्व प्रकारची मदत करण्यात आली. नाट्य चळवळीचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथालय उभारण्यासाठी आम्ही ही छोटी मदत दिली आहे पण ग्रंथालय प्रकल्पाची सर्व जबाबदारी नाट्यपरिषद कोथरूड शाखा घेण्यास तयार आहे. समीर हंपी यांनी सूत्रसंचलनात सांगितले की, साडेबाराहजार रूपयांची मदत यासाठीच आज दिली की प्रशांत दामले यांच्या नाटकांचे आजवर साडेबारा हजार प्रयोग झालेले आहेत. सत्यजीत धांडेकर यानी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading