Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

स्वरमल्हार महोत्सवात नृत्य, व्हायोलिन वादन आणि गायन यांची रसिकांनी घेतली अनुभूती

पुणे  : ओर्लीकॉन बाल्झर्स आणि व्हायोलिन अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या स्वरमल्हार महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी कथक नृत्य, व्हायोलिनवादन आणि गायन यांचा त्रिवेणी संगम रसिकांनी अनुभविला.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा महोत्सव संपन्न होत असून यावर्षी महोत्सवाला बढेकर गृप, विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., विलो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, ओर्लीकॉन बाल्झर्सचे प्रवीण शिरसे, जावडेकर डेव्हलपर्स विलास जावडेकर, लोकमान्य मल्टीपर्पजचे भालचंद्र कुंटे, व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये, महोत्सवाचे आयोजक राजस उपाध्ये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महोत्सवाचा दुसरा दिवस प्रसिद्ध नृत्यांगना निधी प्रभू यांच्या कथक नृत्यप्रस्तुतीने सुरु झाला. निधी प्रभू या डॉ मंजिरी देव आणि पं मुकुंदराज देव यांच्या शिष्या आहेत. खास पुणेकरांसाठी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा…’ या भजनाने त्यांनी आपल्या नृत्यप्रस्तुतीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी झपतालचे प्रभावी सादरीकरण केले. कथक गुरू पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांच्या समोर मी शेवटचा झपताल सादर केला होता. ते गेल्यानंतर झपताल करण्याची हिम्मत झाली नव्हती. आज पुणेकर रसिकांसमोर तो प्रस्तुत करावासा वाटला अशा शब्दांत त्यांनी पंडित बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर त्यांनी काही बंदिशी सादर केल्या. राधा कृष्ण यांची कथा सांगणारी मोह छेडो ना…’ ही बंदिश त्यांनी सादर केली. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नृत्यातून वारीची अनुभूती उपस्थित प्रेक्षकांना दिली. बनारस घराण्याच्या खानदानी बंदिशी सादर करीत उपस्थित रसिकांसोबत जुगलबंदी करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना गुरु पं मुकुंदराज देव (तबला व पढंत), श्रीरंग टेंबे (संवादिनी व गायन) आणि जुबेर शेख (सतार) यांनी साथसंगत केली.

यानंतर ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग रागेश्रीने आपल्या वादनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला सादर केला. यानंतर त्यांनी विलंबित झपताल, तीनताल, मध्यलय तीनताल, दृत तीनताल वाजविला.  गौड मल्हार सोबतच, जैत मल्हार, मियां मल्हार असे मल्हार त्यांनी आपल्या व्हायोलिन वादनाने उपस्थितांसमोर उलगडून दाखविले. ‘साँवरे आई जाइयों साँवरे….’ या रचनेने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना पं कुमार बोस (तबला) आणि राजस व तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली.

“आज जगात संगीताचे महत्त्व अनन्य साधारण वाढले आहे. आपल्या देशाचाच विचार केला तर द्वेष, जातीयता वाढत चालली आहे. आपण आपला इतिहास पाहिला तर हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मांमध्ये प्रतिभावान कलाकार होऊन गेले. दोन्ही धर्मातील कलाकारांनी एकमेकांमधील धर्म नव्हे तर कला पाहिली. त्यांनी कायम समोरच्या कलाकाराचा धर्म बाजूला ठेवत माणुसकीला महत्त्व दिले. धर्म, जाती या कलाकारांसाठी गौण आहेत आणि राहतील. आम्ही कलाकार फक्त मानवता हा एकच धर्म मानतो, अशा शब्दांत पंडित कुमार बोस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं अजय पोहनकर आणि त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांच्या एकत्रित सादरीकरणाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला. अजय पोहनकर यांनी जयंत मल्हार या शुद्ध शास्त्रीय रागाने आपल्या गायनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी पाऊस, बारिश, मेघ यांवर आधारित काही ठुमरी सादर केल्या. पहाडी रागातील ‘बागों में पडे झुलें…’ , ‘नैना मोरे तरस गये… ही राग सिंधी भैरवी मधील ठुमरी याला उपस्थितांनी दाद दिली. पं अजय पोहनकर यांच्या गायनाला अभिजित यांनी केलेली गायन व शास्त्रीय कि बोर्डची साथ उल्लेखनीय ठरली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading