S. Balan Trophy : गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमी, एमईएस इलेव्हन संघांचा पहिला विजय !!
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित तिसर्या ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमी आणि एमईएस इलेव्हन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत अक्षय विल्यम याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमी संघाने रायझिंग डे इलेव्हन संघाचा १३ धावांनी पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीने ११५ धावांचे आव्हान उभे केले. शुभम चव्हाण (३६ धावा) आणि यश गुजर (२० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना रायझिंग डे इलेव्हन संघाचा डाव १०२ धावांवर आटोपला. रायझिंग संघाच्या सागर कांबळे याने ५० धावांची खेळी केली पण, दुसर्या बाजुने त्याला योग्य साथ मिळाली नाही. अक्षय विल्यम याने १३ धावात ५ गडी बाद करून निम्मा संघ तंबुत पाठविला.
दिपक डांगी याच्या अष्टपैलू खेळीमुळे एमईएस इलेव्हन संघाने गाडगे अँड कंपनीचा ४४ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस इलेव्हन संघाने २० षटकात १४३ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये दिपक डांगी याने सर्वाधिक नाबाद ४० धावांची खेळी केली. याला उत्तर देताना गाडगे अँड कंपनी संघाचा डाव १८.२ षटकामध्ये ९९ धावांवर आटोपला. दिपक डांगी याने गोलंदाजीमध्येही चमक दाखवत २ गडी बाद केले.
सामन्याचा संक्षिप्त धावफलकः
१) गॅरी कर्स्टन क्रिकेट अॅकॅडमीः १९.४ षटकात १० गडी बाद ११५ धावा (शुभम चव्हाण ३६, यश गुजर २०, योगेश येलारपुरकर ४-२६, निरज सेन २-३) वि.वि. रायझिंग डे इलेव्हनः १७.४ षटकात १० गडी बाद १०२ धावा (सागर कांबळे ५० (२१, ७ चौकार, ३ षटकार), अक्षय विल्यम ५-१३, रवि चव्हाण २-१२); सामनावीरः अक्षय विल्यम;
२) एमईएस इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १४३ धावा (दिपक डांगी नाबाद ४०, अभिमन्यु जाधव २७, हरी सावंत २६, सचिनकुमार साहू ४-२६) वि.वि. गाडगे अँड कंपनीः १८.२ षटकात १० गडी बाद ९९ धावा (हमझा फारूक २२, प्रसन्ना वर्तक १८, दिपक डांगी २-१७); सामनावीरः दिपक डांगी;
