पुण्यात दोन दिवसीय मारवाडी हॉर्स शोचे आयोजन

३१ मार्च व १ एप्रिल रोजी पुणे रेसकोर्सवर होणार स्पर्धा

पुणे : लढाऊ, चिवट आणि देखणा घोडा अशी ओळख असलेल्या मारवाडी प्रजातीच्या घोड्यांचा रूबाब पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनतर्फे या शोचे ३१ मार्च व १ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले असून रेसकोर्स, पुणे येथे मारवाडी घोडे पाहण्याची संधी अश्वप्रेमींना मिळणार आहे. सकाळी १०.३० ते रात्री १० वाजेपर्यंत हा दोन दिवसीय शो होणार असून नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

घोडय़ांच्या वयोगटानुसार सहा विभागांमध्ये उत्कृष्ट घोड्यांची स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये मिल्क टीथ फिली, मिल्क टीथ कोल्ट, टू टीथ फिली, टू टीथ कोल्ट या प्रकारातील नर आणि मादी अश्वांचा समावेश असणार आहे. देशभरातून जवळपास १२५-१५० अश्व या स्पर्धेत सहभागी होणार असून गुजरात, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातून हे अश्व येणार आहेत. गुरुवारी (३१ मार्च) सकाळी १०.३० रात्री १० या वेळात मारवाडी घोडय़ांची स्पर्धा होईल तर शुक्रवारी (१ एप्रिल) दुपारी २.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत अंतिम फेरी होईल. यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अश्व पुरस्कार जाहीर करण्यात येईल.

याविषयी माहिती देताना इंडिजिनस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय नॅन्सी म्हणाले, मारवाडी अश्व ही एक दुर्मिळ जात असून लढाईतील निष्ठा आणि शौर्य यासाठी ती ओळखली जाते. ब्रिटिश काळात त्यांच्याकडील घोड्यांच्या प्रजाती भारतात आल्या आणि भारतीय अश्वांपैकी सर्वात लढाऊ आणि दिमाखदार मारवाडी अश्वांची प्रजाती मागे पडली. आता अनेक अश्वप्रेमी मारवाडी प्रजातीच्या घोडय़ांचे जतन आणि पालनपोषण करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. मागील सात ते आठ वर्षात हॉर्स शो घेण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे घोड्यांप्रती आकर्षण वाढते आहे. गेल्या काही वर्षात त्यांचे पालनपोषण करण्याकडे कल वाढल्याने मारवाडी घोड्यांची संख्यादेखील वाढली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: